
खडक परिसरातील घोरपडे पेठेत परिसरात दशहत निर्माण करण्यासाठी आठजणांच्या सशस्त्र टोळक्याने दोन चारचाकीसह चार दुचाकी मिळून सहा वाहनांची तोडफोड केली. ही घटना सोमवारी पहाटे चारच्या सुमारास घडली. याप्रकरणी सराईतांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केदार खंडागळे (वय 19, रा. घोरपडे पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी केदारचा भाऊ अपुर्व उर्फ मोन्याची काही दिवसांपुर्वी आरोपींशी वाद झाले होते. त्या वादाच्या रागातून आरोपींनी काल पहाटे कोयता हातात घेउन केदारला दमदाटी करीत धमकाविले.
त्याशिवाय परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी आठजणांच्या टोळक्याने कोयते, बांबू हवेत उंचावून आम्ही इथले भाई आहोत, आमच्या नादाला कोणी लागू नका, नाहीतर एकएकाला कापून टाकू असे म्हणत दहशत निर्माण केली.
परिसरातील दोन चारचाकी आणि चार दुचाकींची तोडफोड करुन नुकसान केले. याप्रकरणी तपास सुरु असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक गणेश माने यांनी दिली.




























































