
मुंबईतील प्राचीन जोगेश्वरी गुंफेजवळील 25 मिटरवरील जागेत थिम पार्क होणार आहे. मात्र, न्यायालयाने ही जागा संपादन करण्याचे आदेश पालिकेला देऊनही जमीन संपादन मात्र रखडले आहे. त्यामुळे ही जागा संपादन करण्यासाठी पालिका प्रशासनाने वेगाने कार्यवाही करावी, अशी मागणी सुधार समितीत शिवसेनेने केली.
जोगेश्वरी येथील प्राचीन लेण्या असलेल्या जोगेश्वरी गुंफेजवळील थीम पार्क तयार करा, अशी मागणी 2013 पासून शिवसेना सातत्याने करत आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. सुनावणीवेळी गुंफेजवळ असलेली अतिक्रमण हटवावीत आणि ही जमीन संपादन करून तिथे थीम पार्क उभारण्याची जागा पालिकेने ताब्यात घ्यावी, असे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
न्यायालयाने आदेश देऊनही जमीन संपादनाची कार्यवाही रखडलेली आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पालिका प्रशासनाने वेगवान करावी, असा मागणी शिवसेना नगरसेवक अनंत नर यांनी प्रस्ताव मांडत केली. त्यावर या परिसरातील जमीन संपादनाची प्रक्रिया अतिक्रमणामुळे रखडली आहे. मात्र, त्यावर लवकरच कार्यवाही करू, असे पालिका प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. दरम्यान, याबाबत पालिकेने अहवाल सादर करावा, अशी सूचना करत सुधार समिती अध्यक्ष सदानंद परब यांनी हा प्रस्ताव राखून ठेवला.
























































