लॉकडाऊनची घोषणा होताच पॅरिसच्या रस्त्यांवर 700 किमीचा ट्रॅफिक जाम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फ्रान्स देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. दिवसाला 50 हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडू लागले आहेत. त्यामुळे दुसऱ्यांदा लॉकडाऊन घोषित झाला आहे. पुढचा एक महिना लोकांना घराबाहेर पडता येणार नाही. याबाबतची घोषणा होताच गुरुवारी लोकांमध्ये एकच खळबळ उडाली. लोक आपलं सामानसुमान गुंडाळून नातेवाईक- मित्रपरिवारांकडे जायला निघाले. तसेच आवश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात घराबाहेर पडले. त्यामुळे पॅरिस आणि परिसरात 700 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा होत्या.

फ्रान्समध्ये कोरोनाचा संसर्ग मोठय़ा प्रमाणात वाढत चालला आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी गुरुवारी राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रोन यांनी चार आठवडय़ांचा दुसरा लॉकडाऊन जाहीर केला. त्यानुसार आता 6 कोटी 70 लाख लोकांना 1 डिसेंबरपर्यंत घरात राहावे लागणार आहे. कुणाच्याही घरी जाता येणार नाही. मात्र घरापासून एक किलोमीटर अंतराच्या आत एक दिवस व्यायामासाठी एक तास जाण्यास परवानगी आहे.

याशिवाय हॉस्पिटले, कामाच्या ठिकाणी किंवा आवश्यक सामान खरेदी करण्यासाठी बाहेर पडता येईल. रेस्टॉरंट, कॅफे बंद करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर घराबाहेर पडून सामानांचा साठा करण्यासाठी लोक बाहेर पडले. विकेंडला सेंट्स डे हॉलिडे असल्यामुळेही ट्रफिक जाममध्ये भर पडली.

लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर दुसऱया दिवशी म्हणजेच शुक्रवारी मात्र पॅरिसच्या रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला. गजबजलेल्या रस्ते सुने झाले. जे लोक घराबाहेर पडले होते, त्यांची कडक तपासणी करण्यात आली.