
देशभरातील रेल्वे स्थानकांचा विकास करण्याचा केंद्र सरकारचा विचार असून देशातील 121 रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना प्रवास करण्यासाठी युजर डेक्हलपमेंट फी भरावी लागू शकते असे सूत्रांचे म्हणणे आहे. यात काही निवडक गर्दीच्या स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकीटाचे दर दुप्पट केले जाणार आहेत.
रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची योजना रेल्वेने आखली आहे. अनेक स्थानकांच्या पुनर्विकासाची टेंडर प्रक्रिया सुरू असून या निविदा प्रक्रियेत युजर फीचा देखील समावेश आहे. युजर चार्जेस फी आकारण्याचा हा निर्णय पुनर्विकासाची प्रक्रिया वेगाने पूर्ण होण्यास महत्वाचा ठरणार आहे.
नागपूर, तिरूपती, चंदीगड, पुद्दुचेरी, डेहराडून, नेल्लोरे आणि ग्वाल्हेर या स्थानकांची पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू झाली आहे. इतर अनेक स्थानकांच्या पुनर्विकासाची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासातून खाजगी विकासकांच्या मदतीने 50,000 कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. यामध्ये महत्वाच्या 121 स्थानकांमध्ये युजर फी देखील आकारण्याचा प्रस्ताव आहे. ही युजर फि 10 ते 35 रूपयांच्या दरम्यान असणार आहे.
युजर फी स्लीपर ते एसी क्लाससाठी भिन्न असेल आणि ती टोकण म्हणून कमीत कमी आकारण्यात येईल असे सूत्रांनी सांगितले. जादा गर्दी होणाऱ्य़ा स्थानकांचे प्लॅटफॉर्म तिकीटही दहा रूपयांवरून 20 रूपये होणार आहे.
रेल्वे स्थानकाच्या परिसराचा पुनर्विकास करण्यात येऊन तेथे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा पुरविण्यात येणार आहेत.





















































