
देशाची राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाची तिसरी लाट आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनीही गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोरोना उपचारांच्या सुविधेत कोणतीही कमतरता पडू नये यासाठी गुरुवारी आढावा बैठक घेण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
दिल्लीत मंगळवारी कोरोनाच्या 6 हजार 725 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे जी आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना रुग्णांची एपूण संख्या 4 लाख 3 हजार 96 वर जाऊन पोहोचली आहे. यापूर्वी 30 ऑक्टोबर रोजी 5 हजार 891 नवे रुग्ण आढळून आले होते. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट आल्याचं आपण म्हणू शकतो, असं आरोग्यमंत्री जैन म्हणाले.
सरकारी रुग्णालय असो वा खासगी सर्व ठिकाणी कोरोना ट्रीटमेंट प्रोटोकॉल एकसमान आहे. सरकारी रुग्णालयात उपचारासाठी आवश्यक बेड आणि आयसीयू सुविधा उपलब्ध आहेत. मात्र बऱ्य़ाचदा रुग्ण खासगी दवाखान्यात जाणे पसंत करत आहेत. आरोग्य विमा असणाऱ्य़ा रुग्णांची संख्याही खासगी दवाखान्यात वाढत आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयात आयसीयू बेडस्ची संख्या कमी पडताना दिसत असल्याचं जैन म्हणाले.
खासगी रुग्णालयातील बेडस्साठी सर्वोच्च न्यायालयात धाव
दिल्लीतील 33 मोठी रुग्णालये तसेच अन्य खासगी रुग्णालयांत 80 टक्के आयसीयू बेडस् कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र त्यावर उच्च न्यायालयाने स्थगिती आणली आहे. यासंदर्भात दिल्ली सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती सत्येंद्र जैन यांनी दिली.
मध्यमवर्गात प्रादुर्भाव वाढतोय
गरीब वस्तीमध्ये सुरुवातीला कोरोनाचा संसर्ग मोठय़ा प्रमाणात होता. आता तो मध्यमवर्ग आणि उच्च मध्यमवर्गाच्या रहिवासी भागात वाढताना दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गेल्या 15 दिवसांपासून कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. अॅग्रेसिव्ह कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर दिला जात असून पुणीही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्यास त्याच्या संपर्कातील सर्वांचीच चाचणी करत आहोत. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणात समोर येत असल्याचं जैन म्हणाले.
























































