
नाट्यगृहांची आता तिसरी घंटा वाजवली आहे. पण कोरोनाच्याच्या काळात निर्मात्यांचे नुकसान झाले असून त्यांच्याकडून विविध मागण्या येत आहेत. नाटय़गृहांच्या भाडय़ाच्या बाबतीत नाटय़निर्मात्यांच्या मागणीवर राज्य सरकार नक्कीच विचार करील असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दिले. मराठी रंगभूमीदिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाटय़ निर्माते, कलाकारांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.
युरोपात संकट वाढले
मराठी पाऊल पडते पुढे असे आपण म्हणतो, पण आता पुढील काळात ते अत्यंत खबरदारीने टाकणे गरजेचे आहे असे सांगून मुख्यमंत्र्यांनी लंडन आणि युरोपमध्ये कोरोनाचे संकट परत वाढले आहे याची जाणीव करून दिली.
सर्वांनी निमय पाळणे गरजेचे
चित्रपट आणि थिएटर यात फरक हा आहे की इथे रिटेक नाही. त्यामुळे अधिक दक्षता घेणे आले. प्रत्येक निर्मात्याने कलाकारांचे चेक अप करणे, स्टेजवर मास्क काढावा लागला तरी कलाकारांनी अंतर किती ठेवायचे, स्वच्छता कशी ठेवायची हे ठरवावे. नाटय़गृहबहेरील खाण्याचे स्टॉल देखील नियम पाळतात की नाही हे पाहिले पाहिजे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, सर्व काही बंद करणे मला मुख्यमंत्री म्हणून यातनादायी आहे हे समजून घ्या असेही ते म्हणाले. यामध्ये सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्यासह आदेश बांदेकर, सुबोध भावे, मंजिरी भावे, अमेय खोपकर, प्रदीप कबरे, बिभीषण चावरे, डॉ. गणेश चंदनशिवे, प्रदीप वैद्य, प्रसाद कांबळी, यांनी चर्चेत सहभाग
घेऊन काही सूचनाही केल्या
मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य सचिव विजय सौरव, हे देखील सहभागी झाले होते.
मास्क-नाही प्रवेश नाही
राज्यातील नाट्यगृहे सुरु करण्यास आजपासून परवानगी दिली आहे. त्या संदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मात्र कोरोनाची भीती अद्याप गेलेली नाही हे लक्षात घेऊन निश्चित केलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे नाटय़ प्रयोग करा व कलाकार तसेच प्रेक्षकांची काळजी घ्या. मास्क नाही- प्रवेश नाही यासह सर्व नियमांचे काटेकोर पालन करून नाटय़प्रयोग करा असे आवाहनही त्यांनी केले.



























































