
‘रिपब्लिक टीव्ही’चा मालक, संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत अधिक भर पडण्यास सुरुवात झाली असून विधिमंडळाने त्यांना बजावलेल्या विशेषाधिकार भंग समितीच्या कामकाजाला आजपासून प्रारंभ झाला आहे.
या विशेषाधिकार भंग नोटीसच्या संदर्भात स्थापन केलेल्या समितीच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार व माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांची नियुक्ती झाली आहे.
यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, हक्कभंग दाखल झाल्यावर समितीच्या कामकाजाला सुरुवात होते. आज पहिली बैठक झाली. अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात दाखल झालेल्या हक्कभंगाच्या संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या अध्यक्षपदी आमदार दीपक केसरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीचे कामकाज व अहवाल जाहीर करता येत नाही, पण समितीची शिफारस येईल त्या आधारावर पुढील कारवाईचा विषय ठरतो. कारवाईचा अहवाल गोपनीय असतो असे नाना पटोले म्हणाले.
अर्णब गोस्वामीना दोन नोटीस
अर्णब गोस्वामी यांनी आपल्या टीव्ही शोदरम्यान मुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील सदस्य तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अवमान केला होता.
त्यामुळे महाराष्ट्राच्या सार्वभौम सभागृहातील सदस्यांचा हा अवमान म्हणजे राज्यातील जनतेचा अवमान असून अशा पत्रकाराविरोधात हक्कभंग दाखल करण्याचा प्रस्ताव शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत मांडला होता. तर विधान परिषदेत भाई जगताप आणि मनीषा कायंदे यांनी गोस्वामीच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला होता.
दोन्ही सभागृहांत हे प्रस्ताव स्वीकारण्यात आले होते. आतापर्यंत हक्कभंग समितीने गोस्वामींना दोन नोटीस बजावल्या आहेत.


























































