
रत्नागिरी जिल्ह्यातील शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी जिल्हा परिषद विविध उपक्रम हाती घेत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड, लांजा आणि राजापूर या ठिकाणी मॉडेल स्कूल उभारणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती सुनिल मोरे यांनी पत्रकारांना दिली. शिक्षण समितीच्या बैठकीत मॉडेल स्कूल उभारण्याबाबत महत्वपूर्ण चर्चा झाली. पूर्वी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा होत्या. त्याच पार्श्वभूमीवर सोयीसुविधांनीयुक्त मॉडेल स्कूल जिल्ह्यात तीन ठिकाणी उभारल्या जाणार आहेत.
शिक्षण सभापती सुनिल मोरे यांच्या अध्यक्षतेखाली जि.प. शिक्षण विभागाची सभा पार पडली. या सभेत कर्मचाऱ्याच्या अपूर्ण राहिलेल्या सेवा पुस्तकांचा विषय चर्चेला आला. 10 ते 15 वर्षे अनेक कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तके भरली गेली नव्हती. ती आता भरुन पूर्ण करण्यात आली आहेत.
मागील काही महिन्यांपासून सुनिल मोरे यांनी शंभर टक्के सेवा पुस्तके भरण्याबाबत कडक धोरण अवलंबले होते. त्यानंतर आता सर्वच तालुक्यातील कर्मचार्यांची सेवा पुस्तके भरुन पूर्ण झाली आहेत. मोरे यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वीच आम्ही शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेतली. रत्नागिरी जिल्ह्यात सध्या शिक्षकांची मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहेत.
शिक्षक भरतीच्या वेळी परजिल्ह्यातील अनेकजण रत्नागिरी जिल्ह्यात भरती होतात आणि काही काळानंतर बदली होऊन आपापल्या जिल्ह्यात जातात. त्यामुळे जिल्ह्यात शिक्षकांची पदे रिक्त होऊन त्याचा परिणाम शैक्षणिक व्यवस्थेवर होतो. त्यामुळे शिक्षकांची भरती करुन त्यामध्ये स्थानिक शिक्षकांना अधिक प्राधान्य द्या, अशी मागणी केल्याचे मोरे यांनी सांगितले.























































