‘लॉकडाऊन’ ठरला ‘वर्ड ऑफ द इयर’! यावर्षीचा महत्त्वाचा शब्द म्हणून कोलिन्स डिक्शनरीत नोंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यावर्षी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अनेक राष्ट्रांमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्यामुळे जगभरात फक्त लॉकडाऊनची चर्चा राहिली. परिणामी ’लॉकडाऊन’ हा शब्द 2020 सालचा ’वर्ड ऑफ द इयर’ ठरला आहे. कोलिन्स डिक्शनरीमध्ये याची नोंद झाली आहे.

कोलिन्स डिक्शनरीने ’लॉकडाऊन’ या शब्दाला अतिशय महत्त्वाचा शब्द ठरवले आहे. वर्षभरात 2.5 कोटींपेक्षा अधिक वेळा या शब्दाचा वापर झालाय. त्याआधीच्या वर्षीं या शब्दाचा वापर फक्त चार हजार वेळा झाला होता. प्रवास, सामाजिक सुसंवाद आणि सार्वजनिक ठिकाणी प्रवेश यावर कडक निर्बंध लादणे, अशी ’लॉकडाऊन’ या शब्दाची व्याख्या कोलिन्स डिक्शनरीने केली आहे. कोलिन्स डिक्शनरीच्या भाषा सामग्री सल्लागार हेलन न्यूजस्टिड यांच्या मते, आमच्या शब्दकोशकारांनी ’लॉकडाऊन’ हा 2020 सालचा शब्द ठरवला. कारण अब्जावधी लोकांचा हा अनुभव होता.

मेक्झिट आणि ब्लॅक लाईव्हज मॅटर

शब्दकोशात केवळ कोरोना महामारीशी संबंधित शब्द चर्चेत नाहीत, तर त्याव्यतिरिक्तही काही शब्द आहेत. काही महिन्यांपूर्वी मेक्झिट हा शब्द प्रिन्स हॅरी आणि त्यांची पत्नी मेगन यांचा शाही परिवारातून वेगळे होण्याचा निणऱयासाठी वापरला जाणारा शब्द खूपच चर्चेत होता. कोलिन्स डिक्शनरीनुसार, अमेरिकेत कृष्णवर्णीय नागरिक जॉर्ज फ्लॉयड याच्या मृत्यूनंतर ब्लॅक लाईव्हजमॅटर (बीएलएम) हा शब्द गाजला होता. हिंसाचार आणि दडपशाहीविरोधातील चळवळ अशी त्याची व्याख्या कोलिन्स डिक्शनरीने केली होती.