
लोकप्रिय सोशल साईट ट्विटरचे ग्रहमान सध्या बरे नाहीत असेच म्हणायला लागेल. कारण हिंदुस्थानचा वादग्रस्त नकाशा दाखवल्यावर हिंदुस्थानकडून सज्जड दम मिळाल्यापाठोपाठ आता एका नव्या वादात ट्विटर प्रशासन सापडले आहे. गुरुवारी सकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या ट्विटर खात्यावरील त्यांचे छायाचित्रच काही काळ गायब झाल्याने नेटकऱ्यांत मोठी खळबळ उडाली होती. अमित शाह यांच्या प्रोफाईल फोटोच्या जागी ट्विटरने एक नोटीस लिहिली होती. कॉपिराईट प्रकरणाअंतर्गत ट्विटरने त्यांचा फोटो हटवल्याचे यात नमूद करण्यात आले होते. अमित शाह यांच्या प्रोफाईल फोटोवर कोणी कॉपिराईट क्लेम केला याची अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.
























































