
ज्ञानदान आणि विद्यार्थी घडवणाऱ्या आदर्श शिक्षकांना मुंबई पालिकेच्यावतीने दिल्या जाणाऱ्या महापौर पुरस्काराची घोषणा महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली. पुरस्कारासाठी 50 शिक्षकांची निवड करण्यात आली असून यात 36 महिला शिक्षक तर 14 पुरुष शिक्षकांचा समावेश आहे. दहा हजार रोख, मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ आणि फेटा असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
हिंदुस्थानचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसानिमित ज्ञानदान आणि विद्यार्थी घडवणाऱ्या शिक्षकांना पालिका दरवर्षी आदर्श शिक्षक महापौर पुरस्काराने गौरवते. या वर्षी या पुरस्काराचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. यासाठी एकूण 123 शिक्षकांच्या थेट मुलाखती घेऊन त्यातून 36 महिला शिक्षक आणि 14 पुरुष शिक्षकांची निवड करण्यात आली. यात पालिकेच्या मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, इंग्रजी, तामिळ, तेलगू, कन्नड, शारीरिक शिक्षण, चित्रकला, हस्तकला, संगीत, विशेष मुलांची शाळा, माध्यमिक, खासगी अनुदानित, विनाअनुदानित शाळांचा समावेश आहे. भायखळा येथे पेंग्विन कक्षात महापौर किशोरी पेडणेकर यांनी पुरस्काराची घोषणा केली. यावेळी उपमहापौर सुहास वाडकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, सभागृह नेते विशाखा राऊत, शिक्षण समिती अध्यक्ष संध्या दोशी, माजी शिक्षण समिती अध्यक्ष अंजली नाईक, सुधार समिती अध्यक्ष सदानंद परब, श्रद्धा जाधव, शिक्षण अधिकारी महेश पालकर आदी मान्यवर उपस्थित होते.
वरळी पब्लिक स्कूलच्या शिक्षकांचा सत्कार
बंगळुरू येथील एज्युकेशन वर्ल्ड इंडिया या संस्थेने जाहीर केलेल्या सर्वेक्षणात वरळी सी-फेस येथील मुंबई पब्लिक इंग्लिश स्कूलने चौथा तर महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकावला आहे. महापौरांनी या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका नम्रता सावंत, माध्यमिकचे मुख्याध्यापक अरविंद पवार तसेच उपशिक्षण अधिकारी संजीवनी कापसे, राजीव तडवी यांचा सत्कार केला.
केईएम, नायरच्या कामगिरीचा उल्लेख
पालिकेच्या केईएम आणि नायर दंत महाविद्यालयाने केलेल्या चमकदार कामगिरीचा महापौर किशोरी पेडणेकर यांनी उल्लेख केला. पालिकेच्या या रुग्णालयांची शैक्षणिक सुविधा, गुणवत्ता आणि संशोधनाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. मुंबईकरांना आरोग्य, शिक्षण यासह अनेक दर्जेदार सुविधा देण्यात पालिका नेहमीच आघाडीवर असते, असे महापौर म्हणाल्या.
शिष्यवृत्ती परीक्षेत पालिका विद्यार्थ्यांना घवघवीत यश
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी 2020 मध्ये घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (5 वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (8 वी) मध्ये पालिकेच्या विद्यार्थ्यांनी इतिहास रचला. पाचवीतील 402 तर आठवीतील 91 विद्यार्थी असे एकूण 493 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. याबाबत शिक्षण समिती अध्यक्ष संध्या दोशी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

























































