पहिल्याच दिवशी साई बाबांच्या चरणी अडीच लाख रुपयांचे दान, हजारो भाविकांनी घेतले दर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्‍य शासनाच्‍या आदेशाने कालपासून पहाटेच्‍या काकड आरतीनंतर श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्‍यात आले. दिवसभरात सुमारे 8 हजार 290 साईभक्‍तांनी सामाजिक अंतराचे पालन करुन साईबाबांच्‍या  समाधीच्‍या दर्शनाचा लाभ घेतल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे यांनी दिली.

बगाटे म्‍हणाले, जगभरात, देश व राज्‍यात आलेल्‍या कोरोना व्‍हायरसच्‍या संकटामुळे प्रतिबंधात्‍मक उपाययोजना म्‍हणून शासनाच्‍या वतीने लॉकडाऊन करण्‍यात आले असून 17 मार्च पासून साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्‍तांना दर्शनासाठी बंद ठेवण्‍यात आले होते.

राज्‍य शासनाने दिनांक 16 नोव्‍हेंबर पासून पाडव्‍याच्‍या मुहुर्तावर महाराष्‍ट्रातील सर्व धार्म‍िकस्‍थळे खुले करण्‍याचे आदेश दिलेले आहेत. तसेच अजुन कोरोना व्‍हायरसचे सावट संपले नसुन साईभक्‍तांना साईबाबांचे दर्शन सुलभरित्‍या व्‍हावे तसेच त्‍यांच्‍या आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने दर्शन रांगेत सॅनिटायझेशन करणे, थर्मल स्क्रिनिंग करणे व दर्शनरांगेत प्रवेश करताना पाय धुण्‍याची व्‍यवस्‍था आदी उपाययोजना संस्‍थानच्‍या वतीने करण्‍यात आल्‍या.

दर्शनासाठी आलेल्‍या भाविकांना गेट क्रमांक दोन मधुन प्रवेश देऊन द्वारकामाई मंदिरातून समाधी मंदिरामधुन दर्शन घेऊन गुरुस्‍थान मंदिर मार्गे 5 क्रमांक गेटद्वारे बाहेर जाणे असा मार्ग उपलब्‍ध करुन देण्‍यात आला. लॉकडाऊननंतर सुमारे 8 महिन्‍याने श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्‍या दर्शनासाठी खुले करण्‍यात आल्‍यामुळे भक्‍तांच्‍या अतिउत्‍सहामुळे दिवसभरात 8 हजार 290 साईभक्‍तांनी सामाजिक अंतराचे पालन करुन साईबाबांच्‍या समाधीच्‍या दर्शनाचा लाभ घेतला. यामध्‍ये शिर्डी ग्रामस्‍थ व शिर्डी पंचक्रोशितील भाविकांचा मोठया प्रमाणात सहभाग होता. तर मंदिर व मंदिर परिसरासह दर्शन रांगेत फुलांची आकर्षक सजावट करण्‍यात आली होती.

काल दिवसभरात सुमारे 3 हजार साईभक्‍तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला. याठिकाणी प्रसाद भोजन घेण्‍यासाठी आलेल्‍या प्रथम 5 साईभक्‍तांचे व दुपारी 12 वाजता श्रीं च्‍या मध्‍यान्‍ह आरतीकरिता प्रथम 10 शिर्डी ग्रामस्‍थांचे व 10 साईभक्‍तांचे पारंपारिक वाद्यांसह पुष्‍प वृष्‍टी करुन स्‍वागत करण्‍यात आले. तर साईभक्‍तांद्वारे देणगी कार्यालयात सुमारे अडीच लाख रुपये देणगी प्राप्‍त झाल्याची माहिती बगाटे यांनी दिली.