विधानपरिषदेत महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, पृथ्वीराज चव्हाण यांचा विश्वास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे विभागाचे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला तसेच तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पदवीधर व शिक्षकच्या प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्यासाठी जोमाने प्रयत्न करावेत असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

महाविकास आघाडीचे पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार प्रा जयंत आसगावकर आणि पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अरुण लाड यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्ता मेळावा कराड येथे संपन्न झाला.  पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, “प्रत्येक निवडणुकीत एक-एक मत महत्वाचे असते तसेच या निवडणुकीत एक एक मत महत्वाचे आहे. यासाठी प्रत्येक मत मतपेटीत जाण्यासाठी मतदारांना अधिकाधिक जागृत करणे गरजेचं आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करणे हा महत्वाचा उपक्रम राबविला गेला व तो आता यशस्वी होताना दिसत आहे. यामुळेच तिन्ही पक्षांची ताकद या निवडणुकीच्या माध्यमातून आपण दाखवून देणे गरजेचे आहे.ही निवडणूक विचारांची आहे आणि ही आपण जिंकणे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच या निवडणुकीसाठी मतदारसंघ मोठा आहे, पाच जिल्ह्यात उमेदवाराला प्रत्येक मतदारापर्यंत पोहचणे शक्य होईल असे होणार नाही. यासाठी आपण सर्वांनी स्वतः उमेदवार आहोत असे समजून प्रचार करावा तरच आपल्याला यश मिळेल अशी चव्हाण म्हणाले.  मला विश्वास आहे कि, पदवीधरांचे व शिक्षकांचे प्रश्न महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून सोडवले जातील यासाठी पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.