हिंदुस्थानी कोरोना लसी हॅकर्सच्या निशाण्यांवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरातील शास्त्रज्ञ आणि औषध कंपन्या कोरोना रोगाच्या संकटावर उपाय शोधत असतानाच आता यातील काही हिंदुस्थानी औषध कंपन्या आणि शास्त्रज्ञ रशियन हॅकर्स ग्रुप्सच्या निशाण्यांवर आल्याचे मायक्रोसॉफ्ट कंपनीने नुकतेच स्पष्ट केले आहे.

मायक्रोसॉफ्टने दिलेल्या रिपोर्टनुसार हिंदुस्थानसह कॅनडा, अमेरिका, दक्षिण कोरिया आणि फ्रान्स हेदेखील कोरोनाच्या लसीवर संशोधन करत आहेत. मात्र आता यापैकी काही कंपन्या आणि शास्त्रज्ञ लवकरच हॅकर्सच्या सायबर ऍटॅकला सामोरे जाण्याची शक्यता आहे. अर्थात या औषध कंपन्या आणि लोकांची नावे मायक्रोसॉफ्टने स्पष्ट केलेली नाहीत.

हिंदुस्थानात सध्या सात कंपन्या कोरोनाच्या लसीवर संशोधन करत आहेत. या व इतर देशांतील औषध कंपन्यांवर पाळत ठेवण्यासाठी Fancy Bear, Strontium, Zinc आणि Cerium हे हॅकर्स ग्रुप सक्रिय झाले आहेत. यातील Strontium हा ग्रुप फॉल्स लॉग इनच्या मदतीने औषध कंपन्यांची महत्त्वाची माहिती चोरण्याच्या प्रयत्नात आहे, तर Zinc ग्रुप फिशिंग ऍटॅक आणि फसव्या मेसेजेसच्या मदतीने हॅकिंगच्या प्रयत्नात आहे. यामध्ये लोकांना नव्या नोकरीच्या संधी, सहलीवर सवलती अशा विविध फसव्या मेसेजेसचा समावेश आहे.

Cerium देखील ई-मेलच्याच मदतीने हॅकिंगच्या प्रयत्नात आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या काही हॉस्पिटल्सवर रॅनसमवेअरचा ऍटॅक झाल्याने मायक्रोसॉफ्टचा हा इशारा गंभीरपणे घेण्याची गरज आहे.

काही दिवसांपूर्वी हॅकर्सने अमेरिकेच्या काही महत्त्वाच्या हॉस्पिटल्सवर हल्ला चढवला होता. रॅनसमवेअरच्या मदतीने चढवण्यात आलेल्या या हल्ल्यात हॉस्पिटल्सचे संगणक लॉक करून त्यांचा ताबा पुन्हा हॉस्पिटल्सकडे देण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर खंडणीची मागणी करण्यात आली होती. यातील काही हॉस्पिटल्सनी अशा प्रकारे खंडणी देऊन सोडवणूक करून घेतल्याचीदेखील चर्चा आहे. काही हॉस्पिटल्सनी मात्र सरळ पोलीस तक्रार केल्याने या हल्ल्याची बातमी सार्वजनिक झाली. अमेरिका पोलीस आता यासंदर्भात विशेष तपास करीत आहेत.