राज्यात कोविडचा मुकाबला करण्यासाठी हाफकिनकडून 107 कोटींची औषध खरेदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका व सध्याची कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन कोविड 19 चा मुकाबला करण्यासाठी हाफकिन महामंडळाकडून 107 कोटी 47 लाख रुपयांची औषधांची खरेदी करण्यास राज्याच्या राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने मंजुरी दिली आहे.

कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये व संस्थांना लागणारी औषधे, सर्जिकल साहित्य, रसायन व उपकरणांची हाफकीन जीव औषध निर्माण महामंडळाकडून खरेदी करणे राज्य सरकारने बंधनकारक केले आहे. त्यानुसार हाफकिन महामंडळाकडून ही औषध खरेदी केली जात आहे.

सप्टेंबरमध्ये झालेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात कोविड 19 च्या उपाययोजनांसाठी 300 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार आता कोविड रुग्णालयांसाठी 107 कोटी 47 लाख 44 हजार 938 रुपयांची औषध खरेदी करण्यास वैद्यकीय शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे. त्यामुळे सरकारी रुग्णालयांमध्ये कोरोनावर उपचार घेणा-या रुग्णांना वेळेवर औषधांचा पुरवठा होण्यास मदत होणार आहे.

कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन रुग्णालयाती औषधे व इंजेक्शने व सर्जिकल साहित्य विनावापर पडून राहणार नाही व त्यांचा योग्य मुदतीत वापर होईल याची दक्षता घेण्याचे आदेश सरकारने दिले आहे. कोणत्याही परिस्थितीत  मंजूर केलेल्या निधीच्या मर्यादेपेक्षा जास्त रक्कम खर्च करण्यात येऊ नये अशाही सूचना जारी केल्या आहेत.

या औषधांमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणारी विविध इंजेक्शने, फेस मास्क, फेस शिल्ड, ग्लोक्हज, सर्जन कॉप, शू कक्हर, प्लास्टिक अॅप्रन आदींचा समावेश आहे. डॉक्टर्स, नर्सेस व इतर कर्मचाऱयांचे कोरोना विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी तब्बल 26 लाख 28 हजार थ्री लेअर फेस मास्क तर 9 लाख 73 हजार 400 फेस शिल्ड विकत घेण्यात येणार आहेत.