बिहार विधानसभेत हिंदुस्थान शब्दास एमआयएम आमदाराची हरकत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहार विधानसभेत सदस्यांच्या शपथविधीदरम्यान एमआयएम आणि सत्ताधारी जेडीयू-भाजप सदस्यांत जोरदार खडाजंगी झाली. एमआयएमचे आमदार अख्तरूल इमान यांनी शपथग्रहण पत्रातील ‘हिंदुस्थान’ शब्दास हरकत घेताच सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी इमान यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

एमआयएमचे अख्तरूल इमान यांचे नाव शपथ घेण्यासाठी पुकारण्यात आले तेव्हा त्यांनी उभे राहून ‘हिंदुस्थान’ शब्दाबद्दल आक्षेप घेतला. शपथपत्रात हिंदुस्थानच्या जागी भारत हा शब्द उच्चारावा, अशी विनंती त्यांनी प्रोटेम स्पीकर मांझी यांच्याकडे केली. आपल्याला उर्दू भाषेत शपथ घ्यायची आहे, असे म्हणत त्यांनी हिंदुस्थान शब्दाला हरकत घेतल्याने विधानसभेत जोरदार खडाजंगी झाली.

जेडीयूचे नेते मदन सहनी यांनी आमदारांनी ‘हिंदुस्थान’ बोललेच पाहिजे, असा आग्रह धरला. तर भाजप आमदार नीरज बबलू यांनी हिंदुस्थान बोलण्यास आक्षेप असणाऱयांनी पाकिस्तानचा रस्ता धरावा. अशा लोकांना या देशात राहण्याचा कुठलाही अधिकार नाही. हे देश तोडणारे लोक आहेत, अशा शब्दांत एमआयएम आमदारांवर हल्ला चढवला.