
हिंदुस्थानला वैश्विक गुंतवणुकीचा हॉटस्पॉट बनवण्याचे स्वप्न आहे. यासाठी देशात आर्थिक सुधारणांना आणखी गती दिली जाईल, असे आश्वासन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोमवारी उद्योजकांना दिले. तसेच सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपन्यांचे खाजगीकरण सुरूच ठेवले जाईल, निर्गुंतवणुकीचा अजेंडा कायम राहील, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
हिंदुस्थानी उद्योग महासंघाने (सीआयआय) आयोजित केलेल्या नॅशनल एमएनसी कॉन्फरन्समध्ये सीतारमण बोलत होत्या. येत्या काळात आर्थिक सुधारणांसाठी आणखी पावले उचलली जातील. देशाने आर्थिक सुधारणा करण्यासाठी कोरोना महामारीच्या संकटाकडे एक संधी म्हणून पाहिले आहे.
महामारीत पंतप्रधानांनी मोठय़ा आर्थिक सुधारणांसाठी पुठलीच संधी सोडली नाही. त्यांनी कित्येक दशके रेंगाळलेल्या आर्थिक सुधारणा मार्गी लावल्या. यापुढेही आणखी सुधारणा केल्या जातील, सकारात्मक पावले उचलली जातील, असे सीतारमण म्हणाल्या.
हिंदुस्थानला आकर्षक जागतिक गुंतवणूक केंद्र बनवण्यासाठी चांगल्या धोरणांची गरज आहे. देशात काम करणाऱ्य़ा बहुराष्ट्रीय कंपन्यांना अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी सरकार प्रचंड मेहनत घेत असल्याचा दावाही त्यांनी केला.
सहा राज्यांमध्ये डेडिकेटेड मॅन्युफॅक्चरिंग झोन
विविध सुधारणांवर भर देऊन आर्थिक क्षेत्राला व्यावसायिक बनवले जात आहे. सरकार खाजगीकरणाच्या मार्गावर पुढे मार्गक्रमण करीत राहील. सहा राज्यांमध्ये फार्मा, मेडिकल डिवायसेस व ऑक्टिव्ह फार्मास्यूटिकल इग्रडिएंट्सच्या (एपीआय) उत्पादनासाठी ‘डेडिकेटेड मॅन्यूफॅक्चरिंग झोन’ची स्थापना करणार आहोत. यात प्रभावी एक खिडकी प्रणाली कार्यान्वित केली जाईल, असेही सीतारमण यांनी स्पष्ट केले.




























































