“यापुढे तुझा क्रोधी स्वभाव सोडून दे, येथे कोणालाही त्रास न देता शांत चित्ताने राहा!”

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> निळकंठ कुलकर्णी

।। श्री गुरुदेव दत्त ।।

।। श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज ।।

कुरवपूर येथे भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांच्या मंदिराजवळ – अनुष्ठानाची एक गुंफा आहे. तिच्यात एक महाभुजंग राहत असे. जेव्हा ही गुंफा श्री स्वामी महाराजांनी पहिली, तेव्हा ती त्यांना ध्यानासाठी एकदम पसंत पडली. त्यांनी त्या महाभुजंगाला सांगितले, ” आम्हाला ध्यानासाठी ही गुहा हवी आहे. तरी चातुर्मास्य संपेपर्यंत तू येथून निघून जा!” नागराजाने त्यांची ती आज्ञा शिरसावंद्य मानली व बाहेर येऊन अत्यंत आदराने श्रीस्वामी महाराजांना वंदन करून, जवळच असलेल्या पुरातन वटवृक्षाच्या ढोलीत राहण्यासाठी तो निघून गेला. तो भुजंग श्रीस्वामी महाराजांचा भक्त बनून दररोज त्यांना नमस्कार करून जात असे. त्याला श्रीस्वामी महाराजांनी सांगितले; “यापुढे तुझा क्रोधी स्वभाव सोडून दे. येथे कोणालाही त्रास न देता शांत चित्ताने राहा !” अद्यापही हा भुजंग तेथेच आहे. मधूनमधून भक्तगणांना त्याचे दर्शन घडते. तो भुजंग गुहेतून बाहेर निघून गेल्यावर, श्री. गांडामहाराजांनी ती गुहा श्रीस्वामी महाराजांना ध्यानासाठी बसण्यासाठी स्वच्छ केली.

कुरवपूर येथे आल्यावर, श्री. गांडामहाराज भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांच्या पादुकांवर पाणी घालू लागले. तेव्हा देवांनी श्रीस्वामी महाराजांना सांगितले की, “गांडाबुवा वाडीला पादुकांवर पाणी घालत नाहीत, मग येथेच पाणी का घालतात ? तरी त्यांना पाणी घालू देऊ नये!” देवाच्या आज्ञेवरून वरून श्री. गांडामहाराजांनी ताबडतोब पादुकांवर पाणी घालणे बंद केले. श्री. गांडामहाराज श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांच्या पादुकांसमोर उभे राहून नम्रपणे म्हणाले, “आजपासून आपल्या पादुकांवर पाणी घालणे बंद केले आहे. इतके दिवस अधिकाराने पाणी घातल्याने वा आपल्याला जो त्रास झाला, त्याबद्दल मी आपली अंतःकरणपूर्वक क्षमा मागतो!”

([email protected])