
1 डिसेंबर म्हणजे मंगळवारपासून बँकेतील आरटीजीएस सेवा आठवडय़ाचे सातही दिवस 24 तास सुरू राहणार आहे. त्याचबरोबर विमा पॉलिसी, रेल्वे गाडय़ांचे वेळापत्रक, गॅसच्या किमतीमध्ये बदल होणार आहेत.
देशातील बँकांमध्ये आतापर्यंत सुट्टीचा दिवस सोडून सकाळी सात ते रात्री नऊ या वेळेत आरटीजीएस सेवा मिळत होती. ती मंगळवारपासून आठवडय़ाचे सातही दिवस 24 तास मिळणार आहे. त्यासाठी रिझर्व्ह बँकेने नियमात बदल केले आहेत. रेल्वेच्या बंद असलेल्या पुणे-जम्मूतावी पुणे झेलम एक्प्रेस आणि मुंबई-फिरोजपूर पंजाब मेल स्पेशल दररोज चालवली जाणार आहे. तसेच पंजाब नॅशनल बँकेच्या एटीएममधून रात्री आठ ते सकाळी आठ यावेळेत 10 हजार किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम काढायची असेल तर नोंदणीकृत मोबाईलवर येणारा वन टाईम पासवर्ड (ओटीपी) द्यावा लागणार आहे.
हप्ता चुकला तरी विमा पॉलिसी सुरूच राहणार
सध्या ग्राहकाने विमा पॉलिसीचा हप्ता वेळेत न भरल्यास किंवा चुकल्यास पॉलिसी बंद पडते. परंतु नव्या नियमानुसार 1 डिसेंबरपासून हप्ता चुकला तरी पॉलिसी बंद होणार नाही. पाच वर्षे हप्ता थकल्यानंतरही ग्राहक विमा पॉलिसीची रक्कम 50 टक्क्यांनी कमी करून पॉलिसी सुरू ठेवू शकणार आहे.
गॅसच्या किमतीही बदलणार
देशात सध्या तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला एलपीजी गॅसच्या किमती निश्चित करतात. त्यामुळे ग्राहकांना कधी दिलासा मिळतो, तर कधी भुर्दंड बसतो. नोव्हेंबरमध्ये ऑईल कंपन्यांनी व्यवसायिक सिलेंडरच्या किमती वाढवल्या असल्याने घरगुती गॅसच्या किमतीही बदलणार असल्याचे निश्चित झाले आहे.

































































