पत्रकारावर जीवघेणा हल्ला करणारा दीड वर्षांनी अटकेत, भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिरवळमध्ये एका दैनिकाच्या पत्रकारावर खुनी हल्ला करून  दीड वर्षांपासून फरार असलेल्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केले. शफीक रफिक शेख असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याने 11 एप्रिल 2019 रोजी वृत्तपत्राच्या वार्ताहरावर हल्ला केला होता.

पोलीस उपनिरीक्षक नितिन शिंदे कर्मचाऱ्यांसह हद्दीमध्ये गस्त घालत होते. त्यावेळी खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथे एका पत्रकारावर खुनी हल्ला करून फरार असलेला शफीक शेख कात्रज बायपास चौकाजवळ मित्राला भेटायला येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार सर्फराज देशमुख आणि सचिन पवार यांना मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने चाकूच्या साहाय्याने पत्रकारावर हल्ला केल्याची कबुली दिली. याप्रकरणी त्याच्याविरूद्ध शिरवळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे.

संबंधित गुन्ह्यात त्याच्या साथीदारांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केले आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक  अर्जुन बोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे, संतोष भापकर, रविंद्र भोसले, सोमनाथ सुतार, सर्फराज देशमुख, सचिन पवार, अभिजित जाधव, गणेश शेंडे, राहुल तांबे आणि विक्रम सावंत यांच्या पथकाने केली