
पुणे-बंगळुरू महामार्गावरील सातारा जिह्यातील शेंद्रे ते कोल्हापूर जिह्यातील किणी टोलनाका यादरम्यान 30 हून अधिक गावे अपघातग्रस्त ठरली आहेत. तब्बल 45 पेक्षाही जास्त ठिकाणांची ब्लॅक स्पॉट म्हणून नोंद आहे. या टप्प्यात वर्षभरात झालेल्या वेगवेगळ्या अपघातांत 125 हून अधिक लोकांनी जीव गमावला आहे. तर, अपघातात कायमची दुखापत झालेल्यांची संख्या 60 वर आहे.
सातारा जिह्यातील शेंद्रे-पेठ नाका ते कोल्हापूर जिह्यातील किणी टोलनाक्यापर्यंतचा प्रवास धोक्याचा ठरत आहे. या टप्प्यात अपघाताचे प्रमाण जास्त आहे. महामार्ग पोलिसांचा आराखडाही हायवे ऍथॉरिटी दुर्लक्षित करीत असल्याने या पट्टय़ात उपाय राबविले जात नाहीत. महामार्गावरील दुरुस्तीच्या सुरू असलेल्या कामांमुळेच सर्वाधिक अपघात झाले आहेत. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाचा हलगर्जीपणा स्पष्ट होतो. काम सुरू असताना चुकीचे फलक लावणे, वाहतूक सेवारस्त्यावरून वळविण्याचे निर्देश असतानाही त्याचे पालन न करणे अशी कारणे अपघाताला निमंत्रण देत आहेत.
महामार्गावरील या पट्टय़ात तब्बल 22 हून अधिक गावांत उड्डाणपूल आहेत. मात्र, तेथेही खबरदारी घेतलेली नाही. महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे आहेत. किणी व तासवडे टोलनाक्यावर दुचाकी वाहनांसाठी स्वतंत्र लेन करण्याची सूचना करूनही त्याचे पालन केले जात नाही. पर्यायाने सरासरी दिवसाआड एका दुचाकीचा तेथे अपघात होत आहे. या पट्टय़ात ट्रक, वाहन थांबा नाही. त्यामुळे चालक झोपू शकत नाहीत. पर्यायाने वाहनांचे अपघात होत आहेत.
ही आहेत अपघात प्रवण क्षेत्रे
z कराड तालुक्यातील कोल्हापूर नाका, मलकापूर फाटा, तासवडे टोलनाका, नांदलापूर फाटा, मसूर फाटा, इंदोली फाटा, वहागाव ही मुख्य अपघातांची ठिकाणे आहेत. दरम्यान, वाळवा तालुक्यातील कासेगाव, केदारवाडी फाटा, नेर्ले, पेठ नाका, वाघवाडी फाटा, किणी टोलनाका आणि सातारा तालुक्यातील काशीळ, अतित, नागठाणे, शेंद्रे, बोरगाव ही मुख्य अपघाताची ठिकाणे आहेत.

























































