
महाराष्ट्र, कर्नाटक राज्यांत प्रसिद्ध असणारी आटपाडीतील उत्तरेश्वर देवाची कार्तिकी यात्रा कोरोनामुळे यंदा रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी फक्त शेळ्या-मेंढय़ांचा बाजार भरविण्यात आला. रविवारी बाजाराच्या पहिल्या दिवशी सांगोला (जि. सोलापूर) तालुक्यातील चांडोलवाडी येथील बाबूराव मेटकरी यांचा दीड कोटी रुपये किमतीचा ‘मोदी’ नावाचा बकरा चर्चेचा मुद्दा बनला. या बकऱयाला 70 लाखांची ऑफर आली. मात्र, बोकडाच्या मालकाने दीड कोटीच्या खाली बोकड विकणार नसल्याचे सांगत ही ऑफर नाकारली. दरम्यान, याच बकऱयाचा वंश असलेल्या आटपाडीतील सोमनाथ जाधव यांच्या मेंढीलाही 13 लाख रुपयांची ऑफर आली होती. जनावरांच्या बाजारात पहिल्याच दिवशी 10 हजार मेंढय़ांची आवक झाली. यात अंदाजे अडीच ते तीन कोटींची उलाढाल झाल्याची माहिती देण्यात आली.

























































