ठसकेबाज तर्रीचा ‘जादूगार’ हरपला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ठाणे आता हायटेक होत असले तरी जिल्हा परिषदेच्या समोर रस्त्याला लागूनच ब्रिटिशांच्या काळातील जुन्या इमारतीत ‘मामलेदार मिसळ’ हे छोटेखानी हॉटेल लागते. आकर्षक इंटेरियर नाही.. रिसेप्शनीस्टकडून होणारे उसने स्वागत नाही.. एकमेकांना चिकटूनच दाटीवाटेने बाकडय़ांवर बसावे लागते. तरीदेखील इकडची गर्दी हटता हटेना.. आज नेहमीप्रमाणे ठाणे स्टेशनवर उतरताच अनेक खवय्यांची पावले ‘मामलेदार मिसळ’कडे वळली. पण गल्ल्यावर सतत दिसणारा लक्ष्मण ऊर्फ मामा मुर्डेश्वर यांचा चेहरा दिसत नव्हता. कर्मचारीही काहीसे अबोल.. समोर मिसळचा घमघमाट सुटलेला, मात्र काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. चौकशी केली तेव्हा कळलं, मामा गेले.

काय होतं या मिसळशी ठाणेकरांचं नातं हे कोणालाही शब्दांत सांगता येणार नाही. केवळ ठाणे नव्हे, संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर सातासमुद्रापल्याडदेखील मामांच्या मामलेदार मिसळचा घमघमाट आहे. महागडय़ा हॉटेलात जाऊन जो आनंद मिळत नाही तो स्वर्गीय आनंद मामलेदार मिसळच्या हॉटेलमध्ये अनेकांना मिळाला. तीन पिढय़ा झाल्या, पण जिभेवरची चव अजून तशीच आहे. ही जादू केली तरी कोणी? एवढय़ा वर्षांचं झणझणीत नातं जपलं तरी कस? अवघं जग सध्या कमर्शियल बनल आहे. प्रत्येक माणूस हा ‘कस्टमर’ आहे. अशा व्यवहारी जगात मामांचे वडील नरसिंह मुर्डेश्वर यांनी 1946 मध्ये मामलेदार मिसळची सुरुवात केली.

ठाण्याची मामलेदार कचेरी म्हणजे त्याकाळी मोठा दबदबा असायचा. नरसिंह मुर्डेश्वर यांनी कचेरीबाहेरच्या जागेत छोटंसं कॅण्टीन सुरू करण्यासाठी भाडय़ाने विकत घेतली. स्वातंत्र्यपूर्वीचा तो काळ माणसाला जिंकण्याचा मार्ग पोटातून जातो हे गुपित कदाचित नरसिंह मुर्डेश्वर यांना उमगलं असावं. त्यांच्या पत्नीनं मिसळचा मसाला सर्वात आधी तयार केला. हा मसाला इतका वेगळा आणि जबदरस्त होता की, अद्यापी त्याची चव व मसाला तयार करण्याची खासियत तशीच आहे. त्यामुळेच कदाचित या मिसळीची चव एवढी वर्षे उलटूनही आहे तशीच टिकली.

मामलेदार मिसळ सुरू केल्यानंतर नरसिंह मुर्डेश्वर यांचं 1952 मध्ये निधन झालं आणि कॅण्टीनची जबाबदारी लहानग्या लक्ष्मणवर येऊन पडली. मात्र त्यांनी हे कॅण्टीन आपल्या प्राणापलीकडं जपलं. केवळ चवच नव्हे तर नातेही टिकवली.

मामलेदार मिसळच्या अनेक शाखा सध्या विविध भागांमध्ये दिसून येतात. विशेष म्हणजे कुठेही गेलं तरी चव आहे तीच. याचा गुपित काय हे अजून कोणालाच माहीत नाही. हा सारा खमंग पसारा जपणारे मुर्डेश्वर मामा यांचं निधन झालं असलं तरी मामलेदार मिसळ खाताना येणाऱया प्रत्येक ठसक्यांनिशी त्यांची आठवण ही होणारचं.