फटाका फेकल्याचा जाब विचारल्यामुळे तरूणाला मारहाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इमारतीच्या टेरेसवरील फटाका खाली फेकल्यामुळे मुलगा जखमी झाला असता, असे सांगत जाब विचारणाऱ्या तरूणाला एकाने मारहाण करुन जखमी केले. ही घटना 26 नोव्हेंबरला रात्री 8 वाजण्याच्या सुमारास नऱ्हेतील प्रज्वल रेसीडेन्सीमध्ये घडली. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनील मुंडे (रा. नऱ्हे) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी युवराज थिगळे (वय 33) यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवराज आणि सुनील प्रज्वल सोसायटीत राहायला आहेत. सुनीलचा मुलगा इमारतीच्या टेरेसवर फटाके फोडत होता. त्यातील एक फटाका त्याने खाली फेकला. त्यावेळी युवराजचा मुलगा खाली खेळत होता. फटाक्यामुळे मुलाला भाजले असते, असे सांगत युवराजने सुनीलला जाब विचारला. त्याचा राग आल्यामुळे सुनीलने युवराजला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केले. याप्रकरणी पोलीस हवालदार भोसले तपास करीत आहेत.