
राज्यात वाघ व इतर वन्य जिवांची संख्या वाढवण्याचा एक भाग म्हणून वन क्षेत्रात कुरण विकासाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी कॅम्पा निधीतून 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती राज्याचे वन मंत्री संजय राठोड यांनी दिली.
राज्य वन्य जीव मंडळाच्या 15व्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात वाघ व इतर वन्य जीव यांची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने वन क्षेत्रात कुरण विकासाचा कार्यक्रम राबवावा, असे आदेश दिले होते. त्यानुसार पॅम्पा निधीमधून वन पुरण व चराई क्षेत्र विकास कार्यक्रम राज्यभर वन क्षेत्रावर राबवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती संजय राठोड यांनी दिली.
वन कुरण व वन चराई क्षेत्र विकास कार्यक्रम राज्यात पहिल्यांदाच अशा प्रकारे भरीव स्वरूपात राबवण्यात येत आहे. यासाठी राज्य कॅम्पा निधीमधून या वर्षासाठी 8 हजार 300 हेक्टर क्षेत्रावर कुरण व चराई क्षेत्र विकासासाठी पुढील चार वर्षांत 200 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
कुरणांचे महत्त्व
गवताळ कुरणे ही फक्त पाळीव प्राणी व वन्य तृण भक्षक प्राणी यांच्यासाठीच उपयोगाची नसून जल व मृदा संधारणासाठी ती तेवढीच महत्त्वाची आहेत. कुरण विकासामुळे जैवविविधतेतसुद्धा भर पडते व निसर्ग समृद्ध होतो.






























































