
नाशिक, येवला तालुक्यातील निमगाव मढ येथे रानडुकरांची शिकार करण्यासाठी ते दबा धरून बसले होते. त्यासाठी ठिकठिकाणी त्यांनी 12 जाळ्या लावल्या होत्या. मात्र रानडुकराची शिकार करण्याआधीच शिकार करायला आलेले ते नऊ जण वनविभाग पथकाच्या जाळ्यात अडकले. शिकार करण्याच्या तयारीत असणाऱया त्या नऊ जणांना वनविभागाच्या पथकाने गुरुवारी ताब्यात घेतले. त्यांच्याकडील पाच दुचाकी, 12 जाळ्या व एक भाला जप्त करण्यात आला आहे.
दिंडोरी तालुक्यातील कोल्हेर येथील देवराम अरुण चव्हाण, गणेश रघुनाथ चौधरी, गुलाब रामचंद्र पालवी, पिंपरी आंचला येथील साहेबराव हरी चौधरी, मोहन चंदर चौधरी, लक्ष्मण दत्तू चौरे, अंबानेर येथील लक्ष्मण हरी मोंडे, कळवण तालुक्यातील हिंगळवाडी येथील पंडित हरी चौधरी, अनिल पुंडलिक चौरे अशी या नऊजणांची नावे आहेत. ते गुरुवारी येवला तालुक्यातील निमगाव मढ येथील एका शेतात रानडुकरांच्या शिकारीसाठी जाळ्या लावून बसले होते. याबाबत माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने छापा टाकून त्यांना जागीच अटक केली. त्यांच्याजवळून पाच दुचाकी, 12 जाळ्या व एक भाला जप्त करण्यात आला. सर्व संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक पूर्व भागाचे उपवनसंरक्षक तुषार चव्हाण व मनमाडचे सहाय्यक वनसंरक्षक सुजित नेवसे यांच्या मार्गदर्शनाखाली येवल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी, वनरक्षक प्रसाद पाटील, राजापूरचे गोपाळ हरगांवकर, अंकाईचे पंकज नागपुरे, वनसेवक विलास देशमुख, वाहनचालक सुनील भुरुक यांनी ही कामगिरी पार पाडली.
































































