
हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया यांच्यामधील पहिल्या टी-20 लढतीत रवींद्र जाडेजाला फलंदाजी करताना दुखापत झाली. मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर त्याच्या हेल्मेटवर चेंडू आदळला आणि त्याच्या मेंदूला इजा झाली. त्यामुळे आयसीसीकडून गेल्या वर्षी ग्रीन सिग्नल दाखवण्यात आलेला ‘कनकशन सब’ हा नियमाचा अवलंब करण्यात आला. त्यामुळे हिंदुस्थानी संघात रवींद्र जाडेजाऐवजी युजवेंद्र चहलला स्थान देण्यात आले. यानंतर याच युजवेंद्र चहलने सामना फिरवला आणि टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या सध्याच्या आणि याआधीच्या संघातील क्रिकेटपटूंनी यावर टीका केली. हिंदुस्थानच्या माजी क्रिकेटपटूंनी मात्र हिंदुस्थानी संघाने कोणतीही चूक केली नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. पण आयसीसीला आता ‘कनकशन सब’ या नियमाचा पुन्हा एकदा विचार करावा लागणार आहे. कारण पहिल्या लढतीत घडलेल्या घटनेनंतर वाद निर्माण झाला असून ‘रनर’प्रमाणे या नियमाचाही दुरुपयोग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आवाज का उठवताहेत? सुनील गावसकर
‘कनकशन सब’ म्हणजे बदली पर्यायी खेळाडू या आयसीसीच्या नव्या नियमाला अनुसरूनच हिंदुस्थानी संघात बदल केला गेला, असे सुनील गावसकर यांना वाटते. यावेळी ते म्हणाले, रवींद्र जाडेजा अष्टपैलू खेळाडू आहे आणि युजवेंद्र चहल हा फिरकी गोलंदाज आहे. पण जर एखादा गोलंदाज एक धाव करो किंवा 100 धावा करो, तो अष्टपैलू खेळाडू आहे असे मला वाटते. तसेच सामनाधिकारी डेव्हिड बून हे ऑस्ट्रेलियाचे आहेत. त्यामुळे त्यांनी परवानगी दिल्यानंतर आवाज उठवण्याची गरजच नाही, असा टोला सुनील गावसकरांनी टीकाकारांना लगावला आहे.
या नियमाचा दुरुपयोग व्हायला नको
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये काही वर्षांपूर्वी ‘रनर’ हा नियम अंमलात आणला जात असे. एखाद्या फलंदाजाला दुखापत झाल्यास त्याला पर्यायी ‘रनर’ म्हणजे धावपटू देण्यात येत असे. दुखापत झालेला खेळाडू फलंदाजी करीत असे आणि पर्यायी खेळाडू त्याचे प्रतिनिधित्व करीत धाव घेत असे. पण या नियमाचा दुरुपयोग होताना दिसून आले. छोटय़ा दुखापतींसाठीही ‘रनर’चे सहकार्य घेण्यात येऊ लागले. अखेरीस या निमयाला फुलस्टॉप लावण्यात आला. याच पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार मार्क टेलर यावेळी म्हणाले, ‘कनकशन’ हा नियम खेळाडूंच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात आला आहे. त्याचा योग्य व जबाबदारीने वापर व्हायला हवा. या नियमाचा दुरुपयोग व्हायला नको, अन्यथा ‘रनर’ नियमाप्रमाणे हा नियमही बंद करण्यात येईल.
तीन दिवसीय सराव सामना आजपासून
हिंदुस्थानी संघ उद्या दुसरा टी-20 सामना खेळणार असला तरी कसोटी मालिकेआधी दोन सराव सामन्यांत हिंदुस्थानी क्रिकेटपटू स्वतःच्या खेळाची चाचपणी करणार आहेत. पहिला सराव सामना उद्यापासून सुरू होणार आहे. हिंदुस्थान ‘अ’ व ऑस्ट्रेलिया ‘अ’ यांच्यामध्ये तीनदिवसीय सराव सामना होणार असून यावेळी अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, पृथ्वी शॉ यांच्यासाठी ही लढत महत्त्वाची असणार आहे.




























































