कोरोनानंतर आता एका अज्ञात रोगाची भीती; एकाचा मृत्यू, 350 हून अधिक रुग्णालयात दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाने सध्या संपूर्ण देशाला विळखा घातला आहे. या दहशतीतून बाहेर पडून लोक आता सावरायला लागले आहेत. पण, दरम्यान एक अज्ञात रोग पसरल्याची भीती सध्या फैलावत असून त्या रोगाचं संक्रमण होण्याचं प्रमाण वाढताना दिसत आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, आंध्र प्रदेशातील एलुरू येथे हा रोग पसरत असल्याचं वृत्त आहे. रविवारी रात्री या रोगामुळे 76 जणांना रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. या रुग्णांना नॉशिया (अन्नावरची वासना जाणे), चक्कर येणे आणि फिट येणे अशी लक्षणं दिसत होती. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

त्यापूर्वी याच रोगाच्या लक्षणांमुळे आणखीही काही जण रुग्णालयात दाखल झाले होते. रविवारी तो आकडा 350च्या वर जाऊन पोहोचला. यातील 186 जणांना आतापर्यंत उपचारानंतर घरी पाठवण्यात आलं असून 164 जणांवर अद्याप उपचार सुरू आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

एलुरूच्या स्थानिक प्रशासनाने सर्व शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर केली आहे. मंगलगिरी येथील एम्स रुग्णालयातले वैद्यकीय तज्ज्ञ आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन (हैदराबाद) या संस्थांनी या रुग्णांच्या रहिवासी परिसरातील पाण्याचे नमुने मागवले आहेत. त्या नमुन्यांचं परीक्षण करण्यात येत असून माणसं आजारी का पडत आहेत, याचा शोध घेण्यात येणार आहे.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी हेही सोमवारी एलुरूच्या दौऱ्यावर असून त्यांनी रुग्णालयात जाऊन पाहणी केली आहे तसेच रुग्णांची भेट घेऊन संबंधित विभागांना संपूर्ण लक्ष देण्याचे आदेश दिले आहेत. कोरोनाच्या प्रकोपात या अज्ञात रोगाची भर पडल्याने एकच खळबळ उडाली आहे.