
कारागृहातून पॅरोलवर बाहेर आलेल्या एका सराईत गुन्हेगाराला वाहन चोरी व दरोडा विरोधी पथकाने पिस्तूलासह सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून 1 पिस्तुल व 2 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. दीपक धनाजी जगताप (26, रा. रांजे, ता. भोर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाहन चोरी व दरोडा विरोधी पथकातील कर्मचारी मेंगे व तापकेरे यांना पॅरोल रजेवर असलेला गुन्हेगार दिपक हा वारजे माळवाडी परिसरात थांबला असून, त्याच्याजवळ पिस्तुल असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दीपकला ताब्यात घेतले. वरिष्ठ निरीक्षक शिल्पा चव्हाण, सहायक निरीक्षक मुजावर, सहायक उपनिरीक्षक जोशी, शिवतारे, मेंगे, जाधव, तापकेरे व होळकर यांनी या ठिकाणी सापळा रचून त्याला पकडले. झडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे 1 पिस्तुल आणि 2 जिवंत काडतुसे मिळाली आहेत. ही कामगिरी वरिष्ठ निरीक्षक शिल्पा चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक मुजावर, सहायक पोलीस उपनिरीक्षक जोशी, शिवतारे, मेंगे, जाधव, तापकेरे व होळकर यांच्या पथकाने केली.
























































