पानटपरी चालकाकडून खंडणी उकळणाऱ्याला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पानटपरी चालवायची असल्यास दररोज 500 रूपयांचा हप्ता द्यावा लागेल. अन्यथा टपरी चालवू देणार नाही, असे म्हणत आतापर्यंत 25 हजारांची खंडणी उकळणाऱ्याला कोंढवा पोलिसांनी अटक केली. इम्तियाज दाउद मेमन (वय 45, रा. मिठानगर, कोंढवा -खुर्द ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. रमजान रज्जाक यांनी याबाबतची तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील एका जागेत रमजान यांनी पानटपरी चालविण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर काही दिवसांनी इम्तियाज त्याठिकाणी येऊन रमजानला दमदाटी करून दररोजचा 500 रूपये हप्ता मागत होता. हप्ता न दिल्यास टपरी चालवू देणार नाही, अशी धमकी देत होता. इम्तियाजने रमजानकडून आतापर्यंत 25 हजार रूपये उकळले आहेत. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक निंबाळकर अधिक तपास करीत आहेत.