पाथर्डी – पुन्हा एकदा बिबटय़ाचा थरार, मफलरमुळे मुलीचा, तर विहिरीत उडी मारल्यामुळे मुलाचा जीव वाचला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
leopard

शेतातील विद्युत पंप सुरू करण्यासाठी गेलेल्या मुलीवर बिबटय़ाने हल्ला केल्याची घटना मिडसांगवी गावात बुधवारी सकाळी घडली आहे. मात्र, मफलर व ओढणी गळ्याभोवती असल्याने मुलगी वाचली आहे. दुसऱया एका घटनेत बिबटय़ाला पाहून विहिरीत उडी मारल्याने एका मुलाचा जीव वाचला आहे.

तानिया दिलावर शेख असे जखमी मुलीचे, तर गणेश सुदाम महानवर (वय – 16, रा. तांबेवाडी, टाकळीमानूर, ता. पाथर्डी) असे विहिरीत उडी मारलेल्या मुलाचे नाव आहे.

तानिया शेख ही बुधवारी सकाळी शेतातील विहिरीवरील वीज पंप सुरू करायला गेली. यावेळी विहिरीवर बसलेल्या तानियावर बिबटय़ाने हल्ला केला. तानियाजवळील मफलर व ओढणी बिबटय़ाच्या तोंडात गेली. मुलीचा आरडाओरडा ऐकून शेजारच्यांनी धाव घेतल्याने बिबटय़ा पळाला. तानियाच्या हातावर जखमा झाल्या आहेत. खरवंडी येथे खासगी दवाखान्यात तिच्यावर उपचार करण्यात आले.

दुसरी घटना तांबेवाडी शिवारात 11 वाजता घडली. शेतात पिकांना पाणी देणाऱया गणेश महानवर याने बिबटय़ा येत असल्याचे पाहून विहिरीत उडी टाकली. आरडाओरडा केल्यानंतर शेजारचे लोक मदतीला धावले.