
बायको नांदायला येत नसल्याच्या कारणावरून तरुणाने सासूरवाडीतच धिंगाणा घातला आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास पुरंदर तालुक्यातील भोसलेवाडी गावात हा प्रकार घडला असून बायकोने दिलेल्या तक्रारीवरून धिंगाणा घालणाऱ्या नवऱ्याविरोधात जेजुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप पांडुरंग मेमाने असे धिंगाणा घालणाऱ्या जावयाचे नाव आहे. याप्रकरणी ऐश्वर्या संदीप मेमाने यांनी तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , संदीप आणि ऐश्वर्या पती- पत्नी असून काही दिवसांपासून ऐश्वर्या पतीकडे न राहता वडिलांच्या घरी भोसलेवाडीला राहतात. पत्नी ऐश्वर्या नांदायला येत नसल्यामुळे संदीपने सासऱ्याच्या घरासमोर धिंगाणा घातला. पत्नीला लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्याने हातात कोयता घेऊन सासर्याला तुम्हाला कापून टाकतो आणि तुमची पोरगी घेऊन जातो असे म्हणाला. बायकोला उद्देशून तुला तुझ्या भावाला आणि तुझ्या घरच्यांना संपवतो असे म्हणून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. जेजुरी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक महाडिक करीत आहेत.



























































