
पाषाण परिसरात दुचाकीस्वार चोरट्यांनी अवघ्या काही मिनीटांमध्ये दोन महिलांच्या गळ्यातील मंगळसुत्र हिसकावून नेल्याच्या घटना बुधवारी रात्री घडल्या.त्यामुळे खळबळ उडाली आहे. दोन चोरीच्या घटनांमध्ये 2 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. याप्रकरणी चतुःश्रुंगी पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पाषाणमधील पांडवनगर परिसरात राहणाऱ्या मनिषा अनिल पाटणकर (47) या बुधवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास विघ्नहर्ता चौकातून त्यांच्या पती व सासू सोबत पायी जात होत्या. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील साडेचार तोळे वजनाचे गंठण हिसका मारून तोडून नेले. मनिषा यांनी आरडा-ओरडा केला. पण, तोपर्यंत चोरटे दुचाकीवरून पसार झाले होते. सीसीटीव्हीमध्ये चोरटे त्यामध्ये कैद झाले आहेत.
दुसNया घटनेत पाषाण सुस रस्त्यावरील पीएमसी बँकेजवळ उषा जीवनराव खोरे (वय 67, रा. पार्वती निवास, शिक्षक कॉलनी) पतीसोबत चालत जात होत्या. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 90 हजार रुपयांचे गंठण हिसकावून नेले. दोन्ही चोरीच्या घटना काही वेळातच घडल्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर चतुःश्रुंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या आहेत.




























































