लोकनेता – मैफलीतील अभंग!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> आशीष शेलार 

सामान्य माणसापासून नेत्यापर्यंत प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळे टप्पे असतात. बरेवाईट प्रसंग असतात. त्यातून संघर्ष करीत माणूस आयुष्याची वाटचाल करीत असतो. जीवनाचा हा संघर्ष शरद पवार यांच्यासारख्या लोकनेत्याने निकराने लढलेला महाराष्ट्राने अत्यंत जवळून पाहिला आहे. सतत लोकांचा विचार करणारा, लोकांसाठी जगणाऱया माणसाचे आयुष्य अत्यंत वेगवान असते. पवारसाहेबांच्या कामाचा धडाका आज वयाच्या 80 व्या वर्षीही पूर्वीसारखाच आहे. म्हणूनच म्हटले की, त्यांचा हा जीवनप्रवास अंखड आणि अभंग मैफलीसारखा आहे.

आज वयाची 80 वर्षांची अखंड मैफल पूर्ण करणारे एक नेतृत्व म्हणजे माननीय शरद पवारसाहेब… आजच्या क्षणी पंडित भीमसेन जोशी यांच्या एका लाइव्ह मैफलीचा यूटय़ुबरील व्हिडीओ डोळय़ांसमोर येतो. पंडितजींची ती मैफल शरद पवार सपत्नीक पहिल्या रांगेत बसून ऐकत आहेत. माननीय शरद पवार यांचे आयुष्य हे अखंड मैफलीतील अभंगासारखे आहे. पंडितजींनी गाताना गाण्याच्या हरकती आणि ताना घ्याव्यात तसे पवारसाहेबांच्या राजकीय कारकीर्दीतील अनेक ‘हरकती’ महाष्ट्रानेच नव्हे, तर देशाने पाहिल्या आहेत. राजकारणासोबतच संगीत, कला, क्रीडा, साहित्य, सहकार अशा विविध क्षेत्रांत शरद पवार यांचा वावर पाहिला की जगण्याची धुंदी असलेले त्यांचे आयुष्य एका अखंड आणि अभंग मैफलीसारखेच वाटते.

महाराष्ट्राच्या विधान भवनाची लायब्ररी असो वा आपल्या संसदेचे ग्रंथालय असो वा युके पार्लमेंटचे ग्रंथालय किंवा मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय किंवा महाराष्ट्रातील पुस्तकांचे गाव असो, पुस्तकांची मैत्री असलेले एक नेतृत्व म्हणजे शरद पवार. एकीकडे पंचायत ते पार्लमेंट आपल्या पक्षाचे राजकारण सांभाळताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद असो वा देशाचे संरक्षणमंत्री अथवा कृषिमंत्री… कोणत्याही पदावर असले तरी रोजच्या कितीही धावपळीत असलेल्या या नेत्याने पुस्तकांचा हा संग कसा जोपासला याबाबत खरंच कधीतरी सविस्तरपणे शरद पवार यांनी सांगायला हवे. त्यांनी वाचलेली पुस्तके, त्यांचे आवडते लेखक, विषय यापासून मराठी वाङ्मयीन चळवळी व त्यातील गेल्या साठ वर्षांतील चढउतार आज एका साहित्यिकापेक्षा तेच अधिक प्रभावीपणे मांडू शकतील, एवढा त्यांचा व्यासंग महाराष्ट्राला ज्ञात आहे. नेहमीच  त्यांच्या राजकीय, सामाजिक जीवनावर बोलले, लिहिले गेले. कधीतरी याबाबतही पवारसाहेबांनी बोलावे एवढे मात्र नक्की, असो.

  संघर्ष हा राजकीय नेतृत्वाच्या आयुष्यातील अविभाज्य भाग आहे. त्याला हिमतीने सामोरे जातात त्यापैकी एक हिंमतवान नेता म्हणजे शरद पवार. संसदीय कारकिर्दीला पन्नास वर्षे पूर्ण करणारे हे हिंमतवान नेतृत्व त्यांनी एका गंभीर आजाराला पण हिमतीने हरवले. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासमोर महाराष्ट्राचे  एक हिंमतवान मुख्यमंत्री म्हणून मराठी बाणा दाखवला तोही अनेकांना माहीत आहे.  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असो वा लोकनेते गोपीनाथ मुंडे असो, या दोघांनीही त्यांच्यावर कडवट टीका केली. माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी तर त्यांच्या ठाकरी शैलीत अत्यंत तिखट शब्दांत टीका केली. त्यानंतरही दोघांतील मैत्री अखंड आणि अभंगच राहिली. हेसुद्धा हिंमतवान माणसाचेच काम. लोकनेते  गोपीनाथ मुंडे यांनीसुद्धा पवारसाहेबांच्या विरोधात राजकीय संघर्षच केला, पण दुर्दैवाने ज्यावेळी मुंडेसाहेबांचे अकाली निधन झाले त्यानंतर आम्ही श्रद्धांजली सभा ठरवली त्यावेळी उपस्थित राहण्याबाबत पहिली वेळ देणारे नेते शरद पवार होते.

क्रिकेटच्या मैदानातील असे अनेक प्रसंग सांगता येतील जे अत्यंत हिमतीने पवारसाहेबांनी लढविले. मुंबई क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून मी काही काळ काम पाहिले. त्यापूर्वी  पवारसाहेबांनी अध्यक्षपद भूषविले होते. त्यांनी ज्यावेळी मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये प्रवेश केला त्यावेळी वाडेकर गटाचा मोठा दबदबा होता. त्याला भिडून त्यांनी या असोसिएशनमध्ये प्रवेश केला. ज्यावेळी लोढा समितीने वयाची अट 70 वर्षे असावी अशी शिफारस केली त्यानंतर स्वतः पवारसाहेबांनी पदाचा राजीनामा दिला.

खेळांवर त्याचे विशेष प्रेम हेही सर्वश्रुत आहे. मला ते जवळून पाहता आले. मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये आम्ही काम करताना आजही ते पाहतो आहे. त्यांच्या क्रिकेटप्रेमाचे अनेक किस्से सांगता येतील तसेच खेळाडूंवर असलेल्या प्रेमाचेही अनेक किस्से सांगण्यासारखे आहेत. इंटरनॅशनल क्रिकेटचे अध्यक्ष असताना राजकीय प्रवास करीत असताना महाराष्ट्रात एका दौऱयात सर्किट हाऊसवर त्यांना भेटण्यासाठी एका इसमाने चिठ्ठी पाठवली. त्याने लिहिले होते की, तो कोणत्या तरी क्षेत्रातील निवृत्त खेळाडू आहे. त्याचे काय काम आहे जाणून घेण्यासाठी पवारसाहेबांनी त्याला बोलावून भेट घेतली. त्याचे बोलणे, शरीरयष्टी पाहता त्या खेळाडूची परिस्थिती हलाखीची असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी आयसीसीमध्ये मिळालेल्या 35 लाख रुपये मानधनात 15 लाख घालून एमसीएमध्ये पन्नास लाखांचा फंड उपलब्ध करून दिला व त्यातून निवृत्त खेळाडूंना निवृत्त वेतन योजना सुरू केली. आजही ती सुरू आहे.  महाराष्ट्रातच नव्हे, तर कर्नाटकमध्येसुद्धा राजकीय कामानिमित्ताने मी जेव्हा प्रवास करतो त्यावेळी  ठिकठिकाणी अशी अनेक माणसे भेटतात, जी पवार साहेबांनी आम्हाला कशी मदत केली, त्यातून ते उभे राहिले असे सांगतात. त्यामध्ये काही मान्यवर संस्थासुद्धा आहेत. अगदी कोकणात गेल्यावर कोकण मराठी साहित्य परिषद असो वा कर्नाटकातील एखादे मराठा मंडळ असे अनेक ठिकाणी पाहायला मिळते.

त्यांची संसदीय कारकीर्दच 50 वर्षांची आहे. त्यांचे कार्यकर्तृत्व, भाषणे, त्यांनी केलेले काम, वेळोवेळी घेतलेल्या राजकीय भूमिका, त्याचे उमटलेले पडसाद या सगळय़ाचा सांगोपांग उल्लेख वेळोवळी आपण वाचत असतो किंवा ऐकत असतो. त्यांनी स्वतः ‘लोक माझा सांगाती’मध्ये आपला जीवनप्रवास मांडला आहे तर अनेकांनी पुस्तकरूपानेही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेतला आहे. त्यांच्यावर पीएचडी केलेले विद्यार्थीही महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्राचा राजकीय इतिहास त्यांच्या कर्तृत्वाचा वेध घेतल्याशिवाय पूर्ण होणार नाही. या सर्वांचा उल्लेख अनेकांकडून होईलच. त्यामुळे मी माझ्या प्रत्यक्ष अनुभवाला आलेले शरद पवार यातील काही बाबी इथे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातील एक छोटा उल्लेख इथे आवर्जून करावासा वाटते. तो इंटरेस्टिंगही आहे.  गृहविभाग सुरक्षेच्या कारणासाठी वॉकीटॉकीवरून मेसेज देण्यासाठी असे कोडवर्ड किंवा नामावली ठेवत असते. तसाच राज्याच्या राजकीय चर्चेच्या वर्तुळात शरद पवार यांचा उल्लेख  कोडवर्डमध्ये काही जण आजही ‘हेविवेट’ असा करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे जागतिक कीर्तीचे नेतेही माननीय शरदचंद्र पवार यांचा उल्लेख आदराने करतात, बारामतीला जातात, त्यावरून पवार यांचे राजकीय स्थान आणि मोठेपण अधोरेखित होते. जेव्हा गेल्या वेळी सत्तांतर झाले त्यानंतर महाराष्ट्राचे  मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी कारभार केला त्यावेळीसुद्धा पवारसाहेबांच्या मुख्यमंत्री काळातील काही गोष्टींचे उल्लेख होत राहिले.

 शरद पवार यांचे आयुष्य हे कवीच्या शब्दात सांगायचे झाले तर,

असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर 

नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर 

संकटांनाही ठणकावून सांगावे आता ये बेहत्तर 

नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर 

कवी गुरू ठाकूर यांच्या या काव्यशब्दांप्रमाणे शरद पवार यांचे जगणे आव्हानांना हिमतीने सामोरे जाणारे, हेविवेट आणि भिडणारे असेच आहे.

(लेखक भाजपचे नेते आणि विधानसभा सदस्य आहेत.)