दलिताशी लग्न केलं म्हणून सख्ख्या भावांनी केली बहिणीची हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दलित तरुणाशी लग्न केलं म्हणून तीन जणांनी आपल्या सख्ख्या बहिणीची हत्या केली आहे. उत्तर प्रदेशमधील आग्रात ही भयंकर घटना घडल्याचं वृत्त आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, चांदनी कश्यप (23) हिचे अर्जुन कुमार (25) या तरुणासोबत आठ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. या संबंधांना चांदनीच्या कुटुंबीयांचा विरोध होता. त्यामुळे हे दोघे जून महिन्यात घरातून फरार झाले होते. 12 जून रोजी दोघांनी अर्जुन याच्या आजोळी एका मंदिरात विवाह केला आणि ते दिल्ली येथे राहण्यास गेले.

त्यानंतर काही काळाने चांदनीच्या भावाचा तिला फोन आला. त्याने तिला तिच्या माहेर येण्याची गळ घातली. तिचं माहेर मैनपुरी येथील किश्नी भागात आहे. भावाच्या सांगण्यावरून 17 नोव्हेंबर रोजी चांदनी मणिपुरी येथे गेली. 20 नोव्हेंबर रोजी ती दिल्लीला परतणार होती.

अर्जुन याने तिला त्याच दिवशी फोन केला. तेव्हा तिने आपल्या भावांनी आपल्याला मारहाण केल्याचं आणि दिल्लीला परत जाऊ देत नसल्याबाबत सांगितलं. त्यानंतर तिचा फोन कट होऊन बंद झाला.

अर्जुनने तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो निष्फळ ठरला. अखेर त्याने मैनपुरीला जाऊन तिची चौकशी केली आणि तिथून रिकाम्या हाताने परत दिल्लीला आला. दिल्लीत त्याने चांदनीच्या कुटुंबाविरोधात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी मैनपुरी येथे जाऊन या प्रकरणाचा तपास केला. त्यावेळी त्यांना काहीतरी अघटित घडल्याचा संशय आला. संशयावरून त्यांनी चांदनीचा भाऊ सुनील याला ताब्यात घेतलं. त्याची चौकशी करत असताना त्याने आपण बहिणीला ठार मारल्याचं कबूल केलं. 20 नोव्हेंबर रोजी अर्जुनशी बोलून झाल्यानंतर त्या चौघांमध्ये वाद झाले होते.

सुनील, सुशील आणि सुधीर अशा तिन्ही भावांनी तिला अर्जुन दलित असल्याने त्याच्यासोबतचं लग्न मोडण्याविषयी सांगितलं. त्याला तिने नकार दिला. या वादाचं रुपांतर कडाक्याच्या भांडणात झालं आणि रागाच्या भरात या तिघांनी तिच्यावर गोळी झाडली. गोळी वर्मी लागल्याने चांदनी जागीच गतप्राण झाली.

यानंतर या तिघांनी आपल्याच शेतात तिला पुरलं. पोलिसांनी तिला पुरलेलं ठिकाण खणून काढलं तेव्हा तिचा मृतदेह सापडला. या प्रकरणी सुनील, सुधीर आणि सुशील या तिघांवर हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सुनीलला अटक झाली असून उर्वरित दोघे जण अद्याप फरार आहेत.