चंद्रपूर शहरातील कचरा संकलनाच्या कंत्राटावरून सत्ताधारी भाजप आणि विरोधी काँग्रेस यांच्यात चांगलाच सामना रंगला आहे. निविदा प्रक्रियेत महानगर पालिकेतील सत्ताधारी भाजपने आर्थिक गैरव्यवहार केल्यानं या घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आता काँग्रेसनं केलीय. त्यामुळं कचऱ्याचा विषय ऐरणीवर आलाय.
कचरा संकलनाचे जुने कंत्राट संपुष्टात आल्याने चंद्रपूर शहर महानगरपालिकेने कचरा संकलनासाठी निविदा मागितल्या. या कामासाठी मे. स्वयंभू ट्रान्स्पोर्ट, पुणे यांच्यासह अन्य पाच कंत्राटदारांनी निविदा सादर केल्या. त्यातील दोन निविदा तांत्रिक पूर्तता न केल्याने रद्द करण्यात आल्या. उर्वरित चार निविदांत मे. स्वयंभूचा दर सर्वात कमी म्हणजे 1700 रुपये प्रतिमेट्रीक टन होता. यामुळं स्थायी समितीने या संस्थेला काम मंजुर केले.
मात्र, नंतर ही सर्व प्रक्रियाच रद्द करण्यात आली. मनपा प्रशासनाने या कामासाठी पुन्हा ई-निविदा मागितल्या. यावेळी हे काम 7 वर्षे आणि वाढीव 3 वर्षे असे एकूण दहा वर्षांकरिता देण्यात येणार असल्याचे कारण पुढे करण्यात आले. आधी काम मंजूर झालेल्या मे. स्वयंभू ट्रान्स्पोर्ट, पुणे या कंत्राटदारासह अन्य तीन कंत्राटदारांनी नव्याने ई-निविदा सादर केल्या. त्यात मे. स्वयंभू ट्रान्स्पोर्ट, पुणे या संस्थेचा सर्वांत कमी दर होता. मात्र, आधी मंजूर झालेल्या कंत्राटातील दरात तब्बल आठशे रुपयांनी वाढ करीत कंत्राटदाराने 2552 एवढी रक्कम नमूद केली. ही वाढीव दराची स्वयंभूची निविदा स्थायी समितीने मंजूर केली. आधी कमी दर टाकणाऱ्या कंत्राटदार कंपनीला लगेच नव्या निविदेत 800 रुपयांची वाढ कशी केली गेली, हा प्रश्नच आहे. त्यामुळे यात मोठे अर्थकारण झाले आहे, असा आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष रामू तिवारी यांनी केला असून, याची चौकशी करण्याची मागणी नगरविकास खात्याकडे केली.
राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात मनपात सत्तेत आलेल्या त्यांच्याच पक्षाच्या पदाधिका-यांनी कचरा संकलनात मोठा घोटाळा केल्याचा आरोप होत आहे. यातून भाजपचा पारदर्शकतेचा फुगा पूर्णपणे फुटला असून, चौकशी झाल्यास मोठा आर्थिक घोटाळा बाहेर येण्याची शक्यता काँग्रेसने व्यक्त केली. काँग्रेसने गंभीर आरोप करताच महापौर राखी कंचर्लावार, स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे यांनी लगेच हे आरोप फेटाळून लावले. नव्या निविदा प्रक्रियेतील तरतुदीनुसार कचरा संकलनात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. आधी घंटा गाडीने कचरा संकलन व्हायचे. आता त्यासाठी चारचाकी वाहनांचा वापर केला जाणार आहे. शहरात यापूर्वी सहाशेच्यावर कचरा कुंड्या होत्या. त्याची संख्या आता शंभरावर आली आहे. त्या सुद्धा कमी करण्यासाठी या निविदेतील तरतुदीचा वापर होणार आहे, असे महापौर यांनी सांगितले. स्वयंभूने आधी 1700 रुपये प्रतिमेट्रीक टनाचे दर दिले होते. मात्र या दरात कामगारांना किमान वेतन देणे शक्य नव्हते. कचरा संकलनाचा बेस रेट जवळपास 2200 रुपये प्रतीमेट्रीक टन आहे. त्यामुळे ही निविदा रद्द करण्यात आली. नवे दोन हजार 552 चे दर केवळ स्वयंभूनेच दिले होते. त्यामुळे त्यांनाच निविदा मंजुर करण्यात आली. यात कोणताही गैरव्यवहार झाला नाही. उलट महिन्याला दहा ते पंधरा लाख रुपये मनपाचे वाचणार आहेत, असा महापौरांनी केला. विरोधकांचे आरोप बिनबुडाचे असल्याचे राखी कंचर्लावार म्हणाल्या.
चंद्रपूर महापालिकेतील प्रत्येक कंत्राट वादग्रस्तच ठरत असतात. आरोप-प्रत्यारोप होतात. पण अशा वादग्रस्त कंत्राटांची चौकशी मात्र कधीच होत नाही. याही कंत्राटात तेच होण्याची शक्यता अधिक व्यक्त होत आहे.

























































