
शहरातील औसा रोडवरील बेकरीमध्ये सामान घेण्यासाठी गेलेल्या व्यक्तीची स्कुटी अज्ञात चोरट्याने पळवली. स्कुटीच्या डिक्कीमध्ये सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 2 लाख 86 हजार रुपयांचा ऐवज होता. या चोरी प्रकरणी येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गोपाळ बद्रीनारायण अग्रोया (वय – 47, रा. लक्ष्मीधाम कॉलनी, औसा रोड, लातूर) यांनी तक्रार दिली आहे.
तक्रारीत नमूद केले आहे की, फिर्यादी हे आपले सोन्या-चांदीचे दुकान बंद करून सुझूकी स्कुटी अॅक्सेस क्र. एमएच 24 बीडी 5673 ने घराकडे जात असताना रस्त्यामध्ये औसा रोडवरील मॉजीनीज बेकरी समोर स्कुटी पार्क करून बेकरीमध्ये सामान घेण्यासाठी गेले असता अज्ञात चोरट्यांनी स्कुटी पळवून नेली. स्कुटीच्या डिक्कीमध्ये स्टिलच्या डब्ब्यात 1 लाख 66 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, रोख 1 लाख 20 हजार रुपये असा 2 लाख 86 हजाराचा ऐवज पळवून नेण्यात आला.
या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक जाधव हे करीत आहेत.




























































