
कोकणातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी बीच शॅक धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे. कोकणात पंचतारांकित हॉटेल्स गुंतवणूक करत आहेत. यापुढील काळातही कोकणाच्या पर्यटन विकासासाठी व्यापक चालना दिली जाईल असे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज सांगितले.
कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आढावा बैठक आयोजित केली होती. कोकणात बीच शॅक टुरिझम, टेंट टुरिझम, कॉराव्हॅन टुरिझम यासह पृषी पर्यटनालाही मोठय़ा प्रमाणात वाव आहे. होम स्टेच्या माध्यमातून कोकणातील लोकांना मोठय़ा प्रमाणात रोजगार मिळेल. मुंबईपासून गोव्यापर्यंतच्या विविध पर्यटन ठिकाणांच्या विकासाचा आराखडा करुन त्याला चालना देण्यात येईल, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व सिंधुदुर्ग जिह्याचे पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार योगेश कदम, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील, पर्यटन संचालक धनंजय सावळकर उपस्थित होते.
संभाजीनगरच्या पर्यटनालाही चालना
संभाजीनगरमधील पर्यटनस्थळांच्या विकासासंदर्भातही पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीला महसूल आणि ग्रामविकास विभागाचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आमदार अंबादास दानवे उपस्थित होते. अजिंठा आणि वेरुळ ही दोन्ही जागतिक स्तरावरील पर्यटनस्थळे आहेत. संभाजीनगर-फर्दापूर-अजिंठा लेणी यासह जिह्यातील सर्व पर्यटनस्थळांना जोडणाऱया रस्त्यांचा विकास होणे आवश्यक आहे. सोयगांव तालुक्यातील फर्दापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याची योजना आहे. त्यामुळे शिवरायांच्या कार्यातून युवा पिढीला प्रेरणा मिळेल असे आदित्य ठाकरे म्हणाले.


























































