
पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी 76 व्या षटकापर्यंत यजमान ऑस्ट्रेलियाला रडवणारा हिंदुस्थानी संघ अखेरच्या सत्रात बॅकफूटवर गेला. 3 बाद 188 या धावसंख्येवरून टीम इंडियाची अवस्था 6 बाद 206 अशी झाली. या कालावधीत कर्णधार विराट कोहली (74 धावा), उपकर्णधार अजिंक्य रहाणे (42 धावा) व हनुमा विहारी (16 धावा) यांना गमावल्यामुळे हिंदुस्थानी संघ अडचणीत सापडला आहे.
ऋद्धिमान साहा (9 धावा) व रविचंद्रन अश्विन (15 धावा) ही जोडी खेळपट्टीवर उभी असून आता या दोघांसह तळाचे फलंदाज कशी कामगिरी करताहेत यावर टीम इंडियाची पहिल्या डावातील धावसंख्या अवलंबून असणार आहे. आता हिंदुस्थानी संघाने 6 बाद 233 धावा केल्या आहेत.
समन्वयाचा अभाव ठरला घातक
विराट कोहली व अजिंक्य रहाणे ही अनुभवी जोडी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचे आव्हान समर्थपणे थोपवून लावत होती. दोघांनी 88 धावांची भागीदारीही रचली. पण नॅथन लायनच्या गोलंदाजीवर एक चूक घडली आणि दिवसभराची मेहनत वाया गेली. अजिंक्य रहाणेने फटका मारल्यानंतर धाव घेण्यासाठी स्टार्ट घेतला. नॉन स्ट्राइकवर असलेला विराट कोहलीही सुसाट सुटला. पण त्याचवेळी अजिंक्य रहाणे थांबला आणि धावू नकोस असे सांगण्याचा प्रयत्न केला गेला. तोपर्यंत विराट धावचीत झाला.
सलामी जोडीचे अपयश
हिंदुस्थानी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. पण हिंदुस्थानच्या दोन्ही सलामीवीरांना या लढतीत अपयशाचा सामना करावा लागला. डावातील पहिल्या षटकातील दुसऱयाच चेंडूवर मिचेल स्टार्पने पृथ्वी शॉचा त्रिफळा उडवला. त्यानंतर पॅट कमिन्सने मयांक अग्रवालला 17 धावांवर त्रिफळाचीत करीत दुसरा धक्का दिला.
पुजाराची चिवट फलंदाजी
चेतेश्वर पुजाराने मागील ऑस्ट्रेलिया दौरा गाजवला आहे. या दौऱयाची सुरुवातही त्याच्याकडून चमकदार झाली. गेल्या दौऱयात चिवट फलंदाजीच्या जोरावर त्याने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना सतावले होते. अॅडलेड येथील पहिल्या कसोटीतही त्याने याचीच पुनरावृत्ती केली. चेतेश्वर पुजाराने कर्णधार विराट कोहलीच्या साथीने 68 धावांची भागीदारी करीत डाव सावरला. त्याने 160 चेंडूंत दोन चौकारांसह 43 धावांची खेळी साकारली. नॅथन लायनच्या गोलंदाजीवर तो मार्नस लॅबुशेनकरवी झेलबाद झाला.























































