जोगेश्वरीतील इंदिरानगर ‘एसआरए’ची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल, रखडलेल्या कामाबाबत मागवला अहवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जोगेश्वरी इंदिरानगर येथील एसआरए प्रकल्पाचे काम गेली अनेक वर्षे विविध कारणांमुळे रखडले आहे. विकासकाच्या निष्काळजीपणामुळे पात्र झोपडीधारकांना त्यांच्या हक्काचे घर मिळणे दुरापास्त झाले आहे. यासंदर्भात माजी राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी पाठविलेल्या पत्राची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेत रखडलेल्या कामाबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश गृहनिर्माण विभागाला दिले आहेत.

जोगेश्वरी इंदिरानगर, न. भू. क्र. 160 येथे राबविण्यात येणाऱया एसआरए प्रकल्पात 987 घरे सर्वेक्षणानुसार पात्र ठरविण्यात आली. त्यासाठी विकासक म्हणून मेसर्स टायवाला यांची नेमणूक केली. या योजनेत असंख्य त्रुटी असून आतापर्यंत 377 झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करण्यात आहे. 610 झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन बाकी असून विकासक बांधकाम अर्धवट स्थितीत ठेवून निघून गेल्याने पात्र झोपडीधारकांना हक्काचे घर मिळणे दुरापास्त झाले आहे.

शासनाच्या माध्यमातून हा प्रकल्प पूर्ण करण्यात यावा, अशी विनंती आमदार रवींद्र वायकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांनी नियमानुसार कार्यवाही करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार गृहनिर्माण विभागाने तत्काळ अहवाल सादर करण्याच्या लेखी सूचना एसआरएला दिल्याचे उप सचिव सु. बा. तुंबारे यांनी आमदार वायकर यांना लेखी पत्राद्वारे कळविले आहे.

रहिवासी भयभीत

इमारतीच्या उंचीसाठी आवश्यक असणारे सिव्हिल एविएशनची परवानगी विकासकाने घेतली नाही. यामुळे नागरी उड्डाण प्राधिकरणाने पाच मजल्यावरील दोन मजले अनधिकृत घोषित करून निष्कासित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच पूर्ण झालेल्या इमारतीचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने इमारतीत राहण्यास गेलेले रहिवासी भयभीत झाले आहेत.

घरे तोडल्याने 400 कुटुंबे बेघर

इंदिरानगर एसआरए योजनेत पात्र ठरलेल्या झोपडीधारकांची घरे विकासकांनी तोडली आहेत. त्यांना अजून भाडेही दिलेले नाही. त्यामुळे 400 कुटुंबे बेघर झाली आहेत. तर 210 झोपडपट्टीधारक आजही त्याच जागेवर वास्तव्य करत असून त्यांनाही पायाभूत सुविधांच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.