दुसरा दिवस गोलंदाजांचा, शुक्रवारी 15 फलंदाज गारद; टीम इंडिया 62 धावांनी पुढे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अॅडलेडची खेळपट्टी दुसऱयाच दिवशी आपला रंग दाखवू लागली आहे. पहिल्या दिवशी सहा फलंदाज गारद झालेल्या या खेळपट्टीवर पहिल्या कसोटीच्या दुसऱया दिवशी तब्बल 15 फलंदाज गारद झाले. हिंदुस्थानचा पहिला डाव 244 धावांमध्ये आटोपला. त्यानंतर जसप्रीत बुमराह, उमेश यादव, रविचंद्रन अश्विन यांच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 191 धावांमध्ये गुंडाळले. पाहुण्या हिंदुस्थानी संघाने दुसऱया दिवसअखेरीस 1 बाद 9 धावा केल्या असून आता विराट कोहलीचा संघ 62 धावांनी पुढे आहे.

हिंदुस्थानने शुक्रवारी 6 बाद 233 या धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरुवात केली, पण त्यांचा डाव 244 धावांमध्येच गारद झाला. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्पने 53 धावा देत 4 फलंदाज बाद केले. पॅट कमिन्सने 48 धावा देत 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.

ऑस्ट्रेलियन फलंदाजांना पहिल्या डावात ठसा उमटवता आला नाही. हिंदुस्थानी गोलंदाजांसमोर त्यांची दैना उडाली. कर्णधार टीम पेनने 10 चौकारांसह नाबाद 73 धावा तडकावल्या. मार्नस लाबुशेनने 47 धावांची खेळी साकारली. या डावात हिंदुस्थानी खेळाडूंनी क्षेत्ररक्षणात सुमार कामगिरी केली, पण तरीही हिंदुस्थानी गोलंदाजांनी निराश न होता टिच्चून मारा केला. कांगारूंचा डाव 191 धावांमध्ये संपुष्टात आला. जसप्रीत बुमराहने 52 धावा देत 2, उमेश यादवने 40 धावा देत 3 आणि रविचंद्रन अश्विनने 55 धावा देत 4 फलंदाज बाद केले.

हिंदुस्थानच्या दुसऱया डावाची सुरुवातही निराशाजनक झाली. पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर युवा पृथ्वी शॉ 4 धावांवरच त्रिफळाचीत झाला. आता मयांक अग्रवाल 5 धावांवर खेळत असून त्याच्यासोबत नाईट वॉचमन म्हणून आलेला जसप्रीत बुमराह शून्यावर खेळत आहे.