निवडणुकांआधी वॉर्डची पुनर्रचना करा! विरोधी पक्षनेते रवी राजा यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्वतःच्या पक्षाला फायदा होण्यासाठी राज्यात भाजपचे मुख्यमंत्री असताना आणि नगरविकास खाते त्यांच्याकडेच असताना मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्डची जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने पुनर्रचना करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकांआधी पालिका वॉर्डची पुनर्रचना करा अशी मागणी पालिकेतील विरोधी पक्षनेते काँग्रेसचे रवी राजा यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देणार असल्याचेही रवी राजा यांनी सांगितले.

2017 मध्ये मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या वेळी राज्यात भाजप सत्तेत होती. यावेळी आपले जास्तीत जास्त नगरसेवक निवडून यावेत यासाठी भाजपने जाणीवपूर्वक वॉर्डची पुनर्रचना चुकीच्या पद्धतीने केल्याचा आरोप पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली. भाजपच्या या स्वार्थाच्या राजकारणामुळेच 2017 मध्ये त्यांचे 84 नगरसेवक निवडून आल्याचे रवी राजा यांनी सांगितले. त्यामुळे 2022 मध्ये होणाऱया निवडणुकीआधी वाॅर्डची पुनर्रचना करण्यात यावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना पत्र देणार असल्याचे रवी राजा म्हणाले.