ज्येष्ठ प्रचारक मा. गो. वैद्य यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्येष्ठ पत्रकार, राजकीय आणि सामाजिक विचारवंत तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी, माजी प्रवक्ते प्रा.  मा. गो. उपाख्य बाबुराव वैद्य यांचे वृद्धापकालीन आजारामुळे  निधन झाले. मागील दोन दिवसांपासून त्यांना अशक्तपणा जाणवत असल्याने धंतोली येथील स्पंदन हॉस्पिटलमध्ये भरती केले होते. आज दुपारी 3.30 वाजता   वयाच्या 97 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी सुनंदा, तीन मुली विभावरी गिरीश नाईक, डॉ. प्रतिभा उदय राजहंस, भारती जयंत कहू, तसेच पाच मुले- धनंजय, डॉ. मनमोहन, श्रीनिवास, शशिभूषण व डॉ. राम  असा मोठा आप्तपरिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा उद्या (रविवार) सकाळी 9.30 वाजता विद्याविहार, प्रतापनगर येथील निवासस्थानाहून निघेल व अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार होतील.

वर्धा जिल्ह्यातील तरोडा या गावी 1923 मध्ये जन्मलेले बाबुराव वैद्य प्राथमिक शिक्षण आटोपल्यावर माध्यमिक शिक्षणासाठी नागपूरला आले. नागपूरच्या तत्कालीन निलसिटी हायस्पूलमध्ये त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यावर नागपूरच्या मॉरिस कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेतले.

बीए आणि एमएला संस्कृत विषयात सुवर्ण पदक मिळवले होते. शालेय जीवनात 1934 मध्ये त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवारांशी संपर्क आला. तेव्हापासूनच ते संघाचे स्वयंसेवक बनले. पहिल्या संघबंदीच्या दरम्यान त्यांनी भूमिगत काम चालू ठेवले होते.

शिक्षक म्हणून त्यांनी काम केले. नंतर आधी मॉरिस कॉलेज आणि मग हिस्लॉप कॉलेजमध्ये संस्कृतचे प्राध्यापक म्हणून सेवा दिली. हिस्लॉप कॉलेजमध्ये 18 वर्षे काम केल्यानंतर संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या सूचनेवरून त्यांनी प्राध्यापकी सोडली आणि ‘दैनिक तरुण भारत’मध्ये कार्यकारी संपादक म्हणून ते रुजू झाले. ‘तरुण भारत’मध्ये कार्यकारी संपादक आणि मुख्य संपादक या पदांवर काम केल्यानंतर तरुण भारतचे संचा 1978 मध्ये मा. गो. वैद्य यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य म्हणून निवड झाली होती.

पूज्य श्री गुरुजी यांच्यासह सर्व सरसंघ चालकांसोबत काम करण्याचे व त्यांना जवळून अनुभवण्याचे भाग्य बाबुरावांना लाभले होते. विधान परिषद सदस्य म्हणून त्यांची कारकीर्द सगळय़ा लोकप्रतिनिधींसाठी सदैव आदर्शवत राहील. मला कायम त्यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद मिळाले आहेत.   – नितीन गडकरी  

आम्ही सारे एका ज्येष्ठ मार्गदर्शकाला मुकलो आहोत. बाबुराव शतायुषी होतील ही खात्री होती; पण काळाने त्यांना आमच्यातून हिरावून घेतले. त्यांच्या जाण्याने ज्ञानसागर, एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व हरपले आहे. त्यांच्या निधनाने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. – देवेंद्र फडणवीस