
जानेवारीमध्ये कोरोना लसीकरण सुरू होण्याची शक्यता असल्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेने आपली तयारी वेगाने सुरू केली असून गेल्या तीन दिवसांत 200 जणांना कोरोना लसीकरणाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. पालिका लसीकरणासाठी 5 जणांच्या 500 टीम बनवणार असून सोमवारपासून डॉक्टरांनाही प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
कोरोना लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर पालिका आपली यंत्रणा तयार ठेवत आहे. यामध्ये महत्त्वपूर्ण असणारी कोल्ड स्टोरेज यंत्रणा कांजूरमध्ये तैनात ठेवण्यात येणार असून प्रमुख रुग्णालयेही सज्ज ठेवण्यात आली आहेत. लसीकरणासाठी पालिका आपल्या आरोग्य कर्मचाऱयांना केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी, जागतिक आरोग्य संघटनेचे कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण देत आहे. यामध्ये आतापर्यंत दोन प्रशिक्षण शिबिरे झाली आहेत. परळमधील केईएम आणि दादरमधील एफ नॉर्थ प्रभाग कार्यालयात आतापर्यंत सुमारे 200 जणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तर सोमवारी दादरमध्ये सर्वसाधारण रुग्णालयातील 35 डॉक्टरांना आरोग्य खात्यातील तज्ञ आणि मुख्य प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
आठ मुख्य प्रशिक्षक, जानेवारीत प्रशिक्षण पूर्ण
राज्य सरकारच्या माध्यमातून 8 मुख्य प्रशिक्षकांना कोरोना लसीकरणाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यांच्या माध्यमातून सध्या पालिका रुग्णालय व आरोग्य विभागातील तज्ञ प्रशिक्षणार्थींमधून प्रशिक्षक नेमणार आहेत. एकूण 500 टीमच्या 2500 जणांना प्रशिक्षण देतील. कोरोना लसीचे वितरण, नियोजन, वापर, हाताळणी, लसीकरण करताना आणि केल्यानंतर रुग्णांवर विपरीत परिणाम दिसून आल्यास घ्यावयाची काळजीबाबत माहिती आणि सॉफ्टवेअरच्या हाताळणीचे प्रशिक्षण दिले जात आहे.































































