
घरगुती कारणातून वाद झाल्यामुळे तीन वर्षीय मुलीला सासरी सोडून माहेरी गेलेली पत्नी नांदायला येत नसल्यामुळे तिच्यावर पतीने कोयत्याने वार करून गंभीररित्या जखमी केले आहे. ही घटना काल सकाळी अकराच्या सुमारास पर्वती पायथा परिसरात घडली आहे.
रूक्मिणी अमित कसबे (रा. पर्वती पायथा ) जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती अमित संजय कसबे याच्याविरूद्ध दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्रपाली नागटिळक यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रूक्मिणी आणि अमितचे काही वर्षापुर्वी लग्न झाले असून ते पर्वती पायथा परिसरात राहायला आहेत. काही दिवसांपुर्वी दोघांमध्ये कौटुंबिक वाद झाले होते. त्यामुळे रूक्मिणी तीन वर्षीय मुलीला सासरी सोडून माहेरी गेली होती.
त्यानंतर काल सकाळी अकराच्या सुमारास अमित तिला भेटायला पर्वती पायथा परिसरात गेला होता. पत्नीसोबत बोलत असताना अचानकपणे त्याने कोयत्याने तिच्यावर वार करून गंभीर जखमी केले आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक आर. जे. कस्पटे तपास करीत आहेत.





























































