
शिवसेना शाखा क्रमांक 203 व कृष्णाई सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत कबड्डी प्रशिक्षण शिबिराला सोमवारी सुरुवात झाली. 27 डिसेंबरपर्यंत सुरू राहणारे हे शिबीर सामाजिक अंतर राखून पार पडत आहे. लालबाग केरू कंपाऊंडमधील मनोरंजन मैदानात हे शिबीर रंगत असून आमदार अजय चौधरी, शिवसेना उपनेते सचिन अहिर, नगरसेविका सिंधू मसुरकर, गोवा राज्य संपर्कप्रमुख जीवन कामत, महिला शाखाप्रमुख भारती पेडणेकर या मान्यवरांच्या उपस्थितीत या कबड्डी प्रशिक्षण शिबिराचा श्रीगणेशा करण्यात आला.
या शिबिरात 18 वर्षांखालील मुले व मुलींचा समावेश आहे. तसेच सहभागी खेळाडूंना मोफट टी शर्ट व नाश्ता देण्यात येत आहे. पहिल्या दिवशी युवा खेळाडूंना विशाल माने, मेघाली कोरगावकर, सोनाली शिंगटे, सचिन कासारे, परेश चव्हाण, रक्षा नारकर या राष्ट्रीय कबड्डीपटूंसह सुरेश दोरगुडे व मंगेश घेगडे या राष्ट्रीय पंचांकडून मार्गदर्शन लाभले. शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त राजेश पाडावे, महाराष्ट्र राज्य पंच समिती सदस्य दीपक मसुरकर, उपशाखाप्रमुख विशाल माने व महेंद्र बहुतुले यांच्या पुढाकारामुळे हे शिबीर पार पडत आहे.






























































