
मराठवाडा, विदर्भाप्रमाणेच मुंबईतही थंडीचा कडाका वाढू लागला आहे. सोमवारी 18 अंशांपर्यंत खाली आलेला पारा मंगळवारी 16 अंशांच्या नीचांकी पातळीवर घसरला. चालू हंगामातील हे सर्वात कमी तापमान ठरले. विशेष म्हणजे मंगळवारी सकाळी मुंबईत माथेरानपेक्षा अधिक गारवा होता. ठाण्यातही पारा आणखी घसरला व 18 अंश किमान तापमानाची नोंद झाली.
उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट आल्याने सलग दुसऱया दिवशी राज्याच्या बहुतांश भागांत पारा 10 अंशांच्या खाली गेला. अनेक भागांत सोमवारच्या तुलनेत मंगळवारी तापमानात आणखी घट झाली. हवामान खात्याकडील नोंदीनुसार, मंगळवारी सकाळी सांताक्रुझमध्ये 16, कुलाब्यात 20, ठाण्यात 18, डहाणूमध्ये 16.6, माथेरानमध्ये 16.2 अंश किमान तापमान होते. अनेक दिवस थंडीच्या प्रतीक्षेत असलेले मुंबईकर-ठाणेकर सकाळी सुखद गारव्याचा अनुभव घेऊ लागले आहेत. मुंबई शहर व उपनगरांत मध्येच हजेरी लावलेल्या पावसामुळे यंदा थंडीच्या आगमनाला लेटमार्प लागला आहे.
राज्यात सर्वात कमी निफाडमध्ये 6.5 अंश तापमान
मंगळवारी राज्यात सर्वात कमी निफाडमध्ये 6.5 अंश किमान तापमान नोंदवले गेले. सोमवारी पहिल्या स्थानावर राहिलेल्या परभणीच्या तापमानात 7.6 अंशांपर्यंत वाढ झाली. पुण्यात 8.2 अंश तापमान नोंद झाले. तसेच सातारा, संभाजीनगर, बारामती, जळगाव, नाशिक, नांदेड या ठिकाणी पारा 9 अंशांच्या खाली आला.
































































