शिंदे गटाविरोधात पालिकेत रणकंदन; महापालिकेत शिवसेनेचा महापौरांना घेराव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिंदे गटाच्या नेत्या शायना एन. सी. यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान केल्याप्रकरणाचे तीव्र पडसाद आज मुंबई महापालिकेच्या सभागृहात उमटले. शिवसेनेने शायना एन. सी. यांचा तीव्र निषेध करत जोरदार घोषणाबाजी करत सभागृह तहकुबीची मागणी गेली, मात्र महापौरांनी चर्चेची मागणी फेटाळत सभागृहाचे कामकाज पुढे रेटत नेले. शिवसेनेसह, मनसे, काँग्रेस, एमआयएम पक्षांच्या नगरसेवकांनी सभात्याग केला आणि सभागृहाबाहेर येऊन ठिय्या दिला. त्यानंतर महापौर दालनात जाऊन महापौरांना घेराव घालून जाब विचारला.

आज पालिकेची महासभा सुरू होण्यापूर्वीच शिवसेनेच्या नगरसेवकांनी सभागृहाच्या आवारात शायना एन. सी. यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करून पालिका मुख्यालय दणाणून सोडले. त्यानंतर पालिका सभागृहातदेखील शिवसेनेच्या नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू आली. महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांनी ‘शायना एन. सी. या अनेक पक्षात फिरतात. जिथे सत्ता तिथे शायना जातात, तुम्ही शायना यांची बाजू घेत असल्याने तुम्हाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे फक्त नावापुरते हवेत का?’ असा संतप्त सवाल उपस्थित केला. तुमचे बाळासाहेब ठाकरे यांच्यावर बेगडी प्रेम असल्याने तुम्ही सभा तहकूब करणार नाहीत. तुमचा खरा चेहरा यानिमित्ताने समोर आला असल्याचे पेडणेकर म्हणाल्या. ‘सभागृहात अर्धा-पाऊण तास चर्चा घडवून आणायला काही हरकत नव्हती. याचा अर्थ बाळासाहेब तुम्हाला फक्त नावासाठी हवे आहेत,’ असे मनसे गटनेते यशवंत किल्लेदार म्हणाले. ‘एवढे मोठे प्रकरण घडूनही शिंदे गट शांत का,’ असा सवाल काँग्रेसच्या अशरफ आझमी यांनी केला.

शायना एन. सी. यांनी अक्षम्य चूक केली असून सत्ताधारी पक्षाला बाळासाहेबांच्या अवमानापेक्षा दैनंदिन कामकाज महत्त्वाचे वाटत आहे, असा जाब विरोधकांनी विचारला. महापौर रितू तावडे यांना शायना एन. सी. या पालिका सभागृहाच्या सदस्या नाहीत. त्यामुळे त्यांचे नाव घेऊन सभागृहातील कामकाजाचे वातावरण बिघडविण्यात येऊ नये, सभागृह तहकूब होणार नाही, अशी भूमिका मांडली. त्यानंतर संतप्त झालेल्या शिवसेनेसह सर्व विरोधकांनी महापौर दालनाबाहेर ठिय्या आंदोलन देत पुन्हा जोरदार घोषणाबाजी करून सभागृह हादरून सोडले. तसेच कारवाईची मागणी लावून धरली. त्यानंतर सभागृहाचे कामकाज संपल्यावर महापौर दालनात जाऊन महापौरांना घेराव घातला.

लालबागमध्ये आज निषेध आंदोलन 

शिवडी विधानसभेतर्फे आमदार अजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सकाळी 10.30 वाजता भारतमाता सिनेमासमोर तीव्र निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात सर्व शिवसैनिक, पदाधिकारी, युवासेना, महिला आघाडी अंगीकृत संघटना कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित राहणार आहेत.

पोस्टर फाडले, तुडवले

डेक्कन शिवसेना भवन येथे शिवसेनेतर्फे शिंदे गटाच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शायना एन.सी.चे पोस्टर फाडून थेट मुठा नदीत विसर्जित केले. यावेळी उपनेत्या सुषमा अंधारे, शहरप्रमुख वसंत मोरे, सहसंपर्क प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, मकरंद पेठकर, विभागप्रमुख अतुल दिघे, चंदन साळुंके, प्रतीक आल्हाट, चिंतामण मुंगी, प्रकाश अंधारे, तेजस मर्चंट, हेमंत जोशी, महिला आघाडीच्या विजया मोहिते, अयोध्या डोईफोडे, सोनाली जुनवणे, मिलिंद पत्की, हनुमंत दगडे, सुनील गायकवाड आदी उपस्थित होते.

पुण्यात जोडे मारो आंदोलन

शिवसेनेच्या महिला आघाडीतर्फे शिंदे गटाच्या शायना एन.सीच्या फोटोला जोडे मारून निषेध नोंदवण्यात आला. महिला आघाडीच्या छाया भोसले, रेखा कोंडे, विजया मोहिते, सविता गोसावी, सोनाली धोत्रे, दीपाली राऊत, आयोध्या डोईफोडे, मीनाक्षी बोराटे तसेच परेश खांडके, संदीप गायकवाड, राकेश बोराटे, नीरज नांगरे, सुहास आढाव, सागर गंजकर, हर्षल ठकार, सुनील गायकवाड, नितीन दलभंजन, बाळासाहेब पायगुडे, अमेय डोईफोडे, प्रतीक अल्हाट यावेळी उपस्थित होते.

शिवसेनेसह मनसेकडून निषेध

शिवसेना विभाग क्र. 2 विभागप्रमुख संतोष राणे, विभाग संघटक मनाली चौकीदार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिनेश साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी शायना एनसी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत तीव्र निषेध व्यक्त केला.  यावेळी नगरसेवक सचिन पाटील, धरम काळे, विधानसभाप्रमुख राजू खान, संतोष धनावडे, राजन निकम, अभिषेक शिर्के, आशीष पाटील, प्रशांत कोकणे, रवींद्र वेदपाठक, कृष्णा मुळीक, सुषमा कदम, ज्योती गावडे यांच्यासह शिवसेना-मनसे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

पालिका मुख्यालयाबाहेर जोडे मारो आंदोलन

शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्र. 12 तर्फे महापालिका मुख्यालयाबाहेर विभागप्रमुख संतोष शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शिवसेनेचे उपनेते रवींद्र मिर्लेकर, अरुण दुधवडकर, अशोक धात्रक यांच्यासह विधानसभाप्रमुख विकास मयेकर, राजू फोडकर, सुनील कदम, शिवाजी रहाणे, अरुंधती दुधवडकर, गायत्री आवळेगावकर, पल्लवी सकपाळ, सुरेखा उबाळे, सरिता तांबट, करुणा गीत, वीणा दौंडकर, कल्पना सुर्वे, सुषमा लिंगवले, कल्पना भांबुरे, सुप्रिया खेडेकर, रिया चेंदवणकर, योगिता पेंढारी, स्वाती वळुंज, नम्रता साळवी, बाजीराव मालुसरे, किरण बाळसराफ अजिंक्य धात्रक, प्रथमेश सकपाळ आदी उपस्थित होते.

डोंबिवलीत शायनाच्या फोटोला काळे फासले 

डोंबिवली पूर्वेतील इंद्रा चौक परिसरात शिवसैनिकांनी आंदोलन करत शायना एन.सी.च्या फोटोला काळे फासले. गली गली में शोर है शिंदे गट चोर है, शिवसेनाप्रमुख अंगार है बाकी सब भंगार है अशा घोषणा देत शिवसैनिकांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. यावेळी कल्याण लोकसभा जिल्हाप्रमुख अभिजीत साकंत, शहरप्रमुख कुणाल ढापरे, युवासेनेचे जिल्हाधिकारी प्रतीक पाटील, तात्या माने, अक्षरा पटेल, प्रियंका विचारे, राहुल चौधरी, जगदीश जुलूम, संजय मांजरेकर, माजी नगरसेवक सुधाकर कायकुळे, प्राजक्ता देशपांडे, वैशाली म्हात्रे, सुनील पवार, स्कप्नील पाटील, काका तोडणकर, सुवर्णा केतन दुर्के उपस्थित होते.

नाशिकमध्ये शिवसेना-मनसे आक्रमक

नाशिकच्या शालिमार येथे शायना एनसी यांच्या प्रतिमेस जोडे मारून जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात नीलेश साळुंखे, ऋषी वर्मा, बाळासाहेब कोकणे, महेश बडवे, सुभाष गायधनी, सचिन बांडे, विशाल कदम, संजय परदेशी, राहुल दराडे, मंदार बर्वे, संजय थोरवे, वीरेंद्र टिळे, संजय चिंचोरे, नितीन जाधव आदींनी सहभाग घेतला. मनसेनेदेखील शायना एन. सी. यांची प्रतिमा फाडून जोरदार निषेध केला. या आंदोलनात प्रदेशाध्यक्ष रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, मनोज घोडके, संदीप भवर, सत्यम खंडाळे आदी सहभागी झाले होते.

सोलापूरमध्ये शेण फासले

सोलापुरात शिवसैनिकांनी शायना एन. सी. यांच्या छायाचित्राला शेण फासून निषेध केला. या आंदोलनात जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, शरणराज केंगनाळकर, शहरप्रमुख महेश धाराशिवकर, सुरेश जगताप, रमेश चौगुले, राजू कुसेकर, विष्णू कारमपुरी, युवासेनेचे संताजी भोळे, राम वाकसे, उज्ज्वल दीक्षित, मनोज कामेगावकर, संदीप बेळमकर, बबलू पंडित, अजय मळगे, तुषार आवताडे आदी सहभागी झाले होते.