पुन्हा रानगव्याचा गवगवा, पाषाण परिसरातून जंगलात पाठविण्यात यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाषाण तळ्यानजीक आज सकाळी नागरिकांना पुन्हा एकदा रानगवा आढळला. त्यामुळे परिसरात व्यायाम करण्यासाठी गेलेल्या नागरिकांमध्ये खळबळ उडाली. कोथरूड परिसरात 13 दिवसांपूर्वी अशाच प्रकारे आलेल्या रानगव्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा रानगवा फिरताना दिसल्यामुळे नागरिकांनी तत्काळ वन विभागाला माहिती दिली. त्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले. दरम्यान रानगव्याला रात्री जंगलात पाठविण्यात यश आले.

Photo – पुण्यात पुन्हा गव्याचा ‘गवगवा’

पाषाण तळ्याच्या समोरअसलेल्या एका मोकळ्या जागेत आज सकाळी सातच्या सुमारास नागरिकांना रानगवा आढळला. त्यामुळे गव्याला पाहताच नागरिकांनी वन विभागासह पोलिसांना माहिती दिली. काही वेळानंतर वन विभागाच्या कर्मचाऱयांनी घटनास्थळी धाव घेऊन रानगव्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू केले. वन विभागासह पोलीस प्रशासनाने गव्याला काबूत ठेवण्याचे प्रयत्न सुरू केले. वन विभागाकडून गव्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. तो जंगल परिसरात गेल्यामुळे रेस्क्यूला अडथळा निर्माण झाला होता.

या रानगव्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात पाठविण्यात यश आले. पाषाण परिसरातील जंगलात आणखी काही रानगवे असण्याची शक्यता आहे. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे.- राहुल पाटील, उप-वनसंरक्षक, पुणे.

रानगवा रस्त्याने पळाल्याने वाहतूककोंडी

रानगवा रस्त्याने पळू लागल्यामुळे अपघाताची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी वाहतूक थांबविली होती. त्यामुळे महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. दूरवर रांगा लागल्यामुळे प्रवाशांना ताटकळत राहावे लागले, मात्र काही वेळानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली.