
दहावी, बारावीच्या फेरपरीक्षांचे ऑनलाइन निकाल जाहीर झाले असून बारावीचा निकाल 4.76 टक्क्यांनी घसरला आहे तर दहावीचा निकाल 9.74 टक्क्यांनी वाढला आहे. या परीक्षेत बारावीचे 12 हजार 751 तर दहावीचे 13 हजार 495 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विभागवार निकालात संभाजीनगर विभागाने बाजी मारली असून या विभागाचा निकाल सर्वाधिक लागला आहे.
दहावी परीक्षेला 41 हजार 397 विद्यार्थी बसले होते त्यांपैकी 13 हजार 495 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी 32.60 इतकी आहे. सर्वाधिक 39.11 टक्के निकाल संभाजीनगर विभागाचा लागला असून नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी 29.52 टक्के इतका लागला आहे. राज्यभरातून 69 हजार 274 बारावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यातील 12 हजार 751 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी 18.41 टक्के इतकी आहे. दहावीप्रमाणे बारावीच्या निकालामध्येही संभाजानगर विभागच 27.63 टक्के निकालासह आघाडीवर आहे. तर सर्वात कमी 14.42 टक्के निकाल कोकण विभागाचा लागला आहे.
विभागवार निकाल (टक्केवारी)
विभाग दहावी बारावी
संभाजीनगर 39.11 27.63
नाशिक 37.42 23.63
कोकण 34.05 14.42
लातूर 33.59 22.5
अमरावती 32.53 16.26
पुणे 30.76 14.94
कोल्हापूर 30.17 14.80
मुंबई 29.88 16.42
नागपूर 29.52 18.63
आजपासून गुणपडताळणी
गुणपडताळणीसाठी 24 डिसेंबर ते 2 जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल. यासाठी प्रति विषय 50 रुपये शुल्क ऑनलाइन पद्धतीने जमा करावे लागेल. तसेच उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीच्या मागणीसाठी ई-मेल, हस्तपोहोच किंवा रजिस्टर पोस्ट यापैकी एका पर्यायाची निवड विद्यार्थ्यांना करता येईल.
मागील तीन वर्षांचा निकाल
इयत्ता 2018 2019 2020
दहावी 23.66 22.86 32.60
बारावी 22.65 23.17 18.41
























































